लठ्ठपणामुळे सासरच्यांकडून छळ; महिलेची आत्महत्या

    दिनांक :28-May-2019
पिंपरी-चिंचवड : केवळ दिसायला लठ्ठ आहे म्हणून पती आणि सासरकडच्या मंडळींकडून सुनेला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून  एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या भोसरी भागात घडल्याचे समोर आले आहे. प्रियांका पेटकर असे आत्महत्या करणाऱ्या पीडित महिलेचे नाव आहे.
 
 
 
प्रियांकाचे केदार पेटकर याच्याशी २०१४ मध्ये लग्न झाले होते. परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच पती केदार याने प्रियंकाला लठ्ठपणामुळे टोमणे मारायला सुरुवात केली. इतकेच नाही तर  बारीक व्हावी म्हणून अनेक दिवस तिला जेवणही दिले जात  नव्हते, अशी तक्रार प्रियांकाच्या नातेवाईकांनी केली आहे.
पतीसोबतच सासरे श्रीकांत पेटकर आणि सासू सुरेखा पेटकर यांच्याकडूनही प्रियांकाचा छळ होत होता. लठ्ठपणामुळे मानसिक त्रास सुरु असतानाच माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता. हा त्रास असह्य झाल्यामुळे माहेरी आलेल्या प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या करत आपले जीवन संपविले. या प्रकरणी प्रियंकाचा भाऊ पुष्कराज प्रभुणे याने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली ही घटना स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांची मानसिकता किती विकृत असू शकते याचे जिवंत उदाहरण आहे.