मतीन पटेल यांची हत्या राजकीय द्वेषातूनच- डॉ.जगन्नाथ ढोणे

    दिनांक :28-May-2019
अकोट : भाजप मध्ये बुथ प्रमुखाला सर्वाधिक मानाचं स्थान आहे,मोहाळ्यातील दिवंगत मतीन पटेल हे प्रामाणिक बुथ प्रमुख होते.त्यांनी लोकसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी बोगस मतदान थांबवून बुथ प्रमुखाची जबाबदारी चोखपणे पार पाडली.त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्यांना धमकावण्यात आलं व नंतर त्यांची हत्या झाली.त्यामुळे पोलिसांनी मतदानाच्या दिवशीचे मतदान केंद्रावरील सीसीटिव्ही फूटेज तपासून त्या अनुषंगाने आरोपींवर कडक कारवाई करावी,असे मागणी अकोटचे माजी आमदार व भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ.जगन्नाथ ढोणे यांनी केले.

येत्या एक-दोन दिवसात पोलिस अधिक्षक व मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दिवंगत मतीन पटेल यांच्या मारेक-यांना लवकरात लवकर अटक करावी,अशी मागणी करणार असल्याचेही डॉ.ढोणे यांनी सांगितले.
मंगळवार (ता.२८) ला दुपारी,भाजप नेते डॉ.जगन्नाथ ढोणे भाजप पदाधिका-यांसमवेत मोहाळा येथे दिवंगत मतीन पटेल यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करणे व वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी आले होते.मृतकाच्या परिवाराचे दुःख पाहून खुप गहिवरुन गेलो असल्याची प्रतिक्रिया डॉ.ढोणे यांनी अकोटला आल्यावर शासकिय विश्रामगृहावर व्यक्त केली.दिवंगत मतीन पटेल यांची हत्या राजकिय द्वेषातून व ते भाजपासाठी प्रामाणिकपणे कार्य करत असतांना झाल्यामुळे ते ख-या अर्थाने शहीद झाले आहेत,असेही डॉ.ढोणे म्हणाले.मतीन पटेल यांच्या घरी ९४ वर्षांची आजारी आई,पत्नी,एक मुलगी व सातव्या व १० व्या वर्गात शिक्षण घेत असलेले दोन मुले असं कुटूंब आहे.घरातला कर्ता पुरुष गेल्याने आज या कुटूंबावर आभाळ कोसळलं आहे.मतीन पटेल हे भूमिहीन होते.ते मुस्लिम बहूल गांव असलेल्या ग्राम मोहाळ्यात फार पूर्वी पासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते होते.त्यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय निधी साठी स्वतःजवळच्या बचतीचे ५०० रुपये दिले होते,अशी माहिती डॉ.ढोणेंनी दिली.मतीन पटेल भाजपमध्ये किती सक्रियपणे कार्य करत होते,याचे पुरावेच डॉ.ढोणेंनी समोर ठेवले.मतीन पटेलच्या मुलांच्या शैक्षणिक संगोपनाचे पालकत्व घेत असल्याचे वचनही डॉ.ढोणे यांनी दिले.तसेच त्यांच्या कुटूंबियांना ईदनिमित्त १० हजाराचे अर्थसहाय्य देत असल्याचे सुध्दा त्यांनी जाहीर केले.
त्या प्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ.अशोक ओळंबे,हाजी चाँद खाँ,संजय चौधरी,जाकीर शहा,नगरसेवक मंगेश चिखले आदी भाजपा नेत्यांसह फाजील पटेल उपस्थित होते.