नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के

    दिनांक :28-May-2019
नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. त्यात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ८२.५२ टक्के आहे. नागपूर विभागात सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची असून, ती ६८.८० टक्के असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिली.
नागपूर विभागातून १ लाख ५८ हजार ४२७ विद्याथ्र्यांची नोंदणी करण्यात आली. त्यातील १ लाख ५८ हजार ३१९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १ लाख ३० हजार ६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नियमित विद्याथ्र्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८२.५१ टक्के आहे. या परीक्षेसाठी ७ हजार ७२६ विद्याथ्र्यांची पुनर्परीक्षार्थी म्हणून नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ७ हजार ७१८ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली, त्यात १७३६ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी २२.४९ टक्के आहे.
 
 
 
परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यावेळी मंडळाने इंग्रजी भाषा या विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिका योजना लागू केली होती. आज घोषित झालेल्या नागपूर विभागाच्या निकालात सर्वाधिक म्हणजे ८७.९९ टक्के निकाल गोंदिया जिल्ह्याचा आहे तर सर्वात कमी म्हणजे ६८.८० टक्के निकाल गडचिरोली जिल्ह्याचा आहे.
मार्च २०१८ मध्ये घोषित झालेल्या बारावीच्या निकालात नियमित विद्याथ्र्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.५७ टक्के होती. तर यावर्षी निकालाचे प्रमाण ८२.५१ टक्के आहे. त्यामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाच्या निकालात ५.०६ टक्के घट झाल्याचे दिसत आहे. यासोबतच पुनर्परीक्षार्थीं विद्याथ्र्यांचा निकाल मागील वर्षी ३३.५३ टक्के होता तर यावर्षी ते प्रमाण २२.४९ टक्के आहे. त्यामुळे या प्रवर्गात देखील टक्केवारीत ११.०४ टक्क्यांची घट दिसत आहे.
या निकालानंतर उत्तीर्ण विद्याथ्र्यांना आपल्या गुणांमध्ये आणखी वाढ अपेक्षित वाटते. त्यासाठी जुलै २०१९ व फेब्रुवारी २०२० अशा दोन संधी उपलब्ध आहेत. ऑनलाईन निकालाची घोषणा झाल्यानंतर उद्या, २८ जुलैपासून गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थी शिक्षण मंडळाकडून छायाप्रतींची मागणी करू शकतात. याप्रसंगी सहसचिव मधू सावरकर उपस्थित होत्या.
 
विज्ञान शाखा अव्वल
यावर्षी विज्ञान शाखेतील उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.४४ टक्के असून ती सर्व विद्या शाखांमध्ये अव्वल आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य ८६.७९ टक्के, एमसीव्हीसी ७८.७० टक्के तर कला शाखेत उत्तीर्णतेचे प्रमाण ७३.६१ टक्के आहे.
 
कॉपी प्रकरणात गडचिरोली अव्वल
बारावी परीक्षेच्या काळात गैरमार्ग (कॉपी) अवलंबाची एकूण ७३ प्रकरणे लक्षात आली. त्यात गडचिरोलीत सर्वाधिक ४४ प्रकरणे होती. ७१ विद्यार्थी दोषी असल्याचे सिद्ध झाले. परीक्षेनंतर गैरमार्गाचा अवलंब करण्याची प्रकरणे १७ होती त्यात ७ विद्यार्थी दोषी असल्याचे आढळून आले.