नागपुरात पारा ४७ अंशाच्या पार

    दिनांक :28-May-2019

 
 
सूर्य प्रकोपाने विदर्भ होरपळला
-नागपूर-47.5 तर चंद्रपूर-47.8 अंशावर
-20 वर्षानंतर 48 अंशाकडे वाटचाल
-3 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम
 
नागपूर: विदर्भाच्या उन्हाचे खरे रूप आता जाणवू लागले असून, मागील आठवड्याभरापासून 45, 46 अंश सेल्सियस असलेले तापमान आज अचानक वाढले आणि संपूर्ण विदर्भ सूर्यप्रकोपाने होरपळत असल्याचे जाणवत आहे. नागपूर व चंद्रपूर ही दोन शहरे विदर्भात अधिक तापमानासाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही शहरांनी आपली परंपरा कायम राखली. आज नागपूर शहराचे तापमान 47.5 अंश तर चंद्रपूरचे तापमान 47.8 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले.
मागील सात ते आठ वर्षांपासून मे महिन्याअखेर नागपूर शहराचे तापमान 46 अंश किवा 47 अंशांच्या आत राहिले आहे. पण आज नागपूरच्या उन्हाळ्याने मागील 20 वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडत 48 अंशाकडे वाटचाल सुरू केली असल्याचे दिसत आहे. आज दोन शहरांचे तापमान सर्वाधिक असले तरी विदर्भातील इतर शहरे फारशी मागे नाहीत. अकोला 45.5, अमरावती-45.8, बुलडाणा-45.7, ब्रम्हपुरी-46.9, गडचिरोली 46.0, गोंदिया 45.5, वर्धा 46.5 तर यवतमाळ येथे 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
मागील आठवड्याभरापासून नागपूर वेधशाळेने सातत्याने उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. नेहमीप्रमाणे अनेकांनी त्याची खिल्ली उडविली पण दोन आठवड्यापासून वेधशाळेचा तापमानविषयक अंदाज खरा ठरला आहे. आज नागपूर शहराच्या तापमानाने 48 अंशाकडे वाटचाल केली आहे. आता तापमानाचा हा ट्रेण्ड येत्या 3 जूनपर्यंत कायम राहणार असून, या काळात नागपूरसह विदर्भाचे तापमान 46 ते 47 अंश सेल्सियस दरम्यान राहणार आहे.
सध्या लग्नाचा हंगाम असल्यामुळे विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये नागरिकांचे जाणे-येणे सुरू आहे. त्याचप्रमाणे शहरात आयोजित लग्नसोहळ्यांमध्येदेखील मोठ्या संख्येने लोक सहभागी होत असले तरी सकाळी 9 ते 10 वाजल्यानंतर फारसे कुणी घराबाहेर पडत नाहीत. शासनाने देखील तशा सूचना जारी केल्या असून, त्यानुसार शहरातील मेयो, मेडिकल, डागा आणि आयसोलेशन रुग्णालयातदेखील उष्माघाताचे रुग्ण दाखल होत आहेत. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे शहरात दिवसभर रस्त्यांवर संचारबंदी लागल्यागत नीरव शांतता असते.