शपथविधीचे निमंत्रण न मिळाल्याने पाकिस्तानचा थयथयाट

    दिनांक :28-May-2019
इस्लामाबाद,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे रोजीच्या शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान या ‘बिमस्टेक’ राष्ट्रसमूहातील प्रमुखांना निमंत्रण दिले, पण पाकिस्तानला निमंत्रण न दिल्याने, या देशाने थयथयाट केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण न देण्यामागे पंतप्रधान मोदी यांची अंतर्गत राजकीय अपरिहार्यता कारणीभूत असू शकते, असा तर्क पाकिस्तानने काढला आहे.
 
 
 
पंतप्रधान मोदी यांनी इम्रान खान यांना शपथविधीसाठी का बोलावले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यापेक्षा आम्हाला, काश्मीर, सियाचीन आणि सर क्रीक यासारख्या मुद्यांवर तोडगा काढणे जास्त महत्त्वाचे वाटते.
 
भारतातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात नरेंद्र मोदी यांनी आपले प्रत्येक भाषण पाकिस्तानच्या विरोधातच केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इम्रान खान यांना निमंत्रणाची अपेक्षा तशीही कमीच होती. भारतातील अंतर्गत राजकारणही मोदींना तशी परवानगी देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
गेल्या वर्षी इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करतानाच, द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर चर्चाही केली होती, तसेच इम्रान खान यांनीही भारतातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी यांना फोन करून, त्यांचे अभिनंदन केले होते. आम्ही आमच्यातर्फे सदिच्छा पाऊल उचलले आहे, आता भारताने समोर येण्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला.