भाजपा नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता

    दिनांक :28-May-2019
विधानपरिषद पोटनिवडणूक
 
 
सांगली: कॉंग्रेस नेते आणि राज्याच्या विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या आमदारपदाच्या पोटनिवडणूक प्रकियेला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी सांगली भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख भाजपाकडून अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ बिनविरोध पडण्याची शक्यता आहे.
विधानसभेत भाजपा-शिवसेनेचे पुरेसे सदस्य असल्याने कॉंगेस ही निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. येत्या सात जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपाचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. कॉंग्रेसचे 42, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सात अपक्ष, तर इतर पक्षांचे 13 आमदार आहेत.
 
 
 
सांगली जिल्हात जिल्हाध्यक्ष या नात्याने भाजपाचा विस्तार करण्यामध्ये देशमुखांचा मोलाचा वाटा राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांमध्ये एकसंधपणा ठेवत देशमुख यांनी संजयकाका पाटील यांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून देशमुख यांचे नाव पुढे आले.
आमदार शिवाजीराव देशमुख यांचे 14 जानेवारी 2019 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले होते. संबंधित जागेवरील सदस्याचा कार्यकाळ 24 एप्रिल 2020 रोजी संपणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजयी होणार्‍या उमेदवाराला फक्त 11 महिने कामकाजाची संधी मिळेल.
घ(वृत्तसंस्था)