नगरची शुभांगी करणार भारताचे प्रतिनिधित्व

    दिनांक :28-May-2019
अहमदनगर,
येथील संजयनगर झोपडपट्टीत राहणारी शुभांगी राजू भंडारे इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक वंचित फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिचे वडील वडापाव विकतात तर आई हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करते. अनेक असुविधा आणि गरिबीवर मात करीत शुभांगीने हे यश मिळवले.

 
मागील आठवड्यात शुभांगी हिची भारताच्या महिला फुटबॉल संघामध्ये "होमलेस वर्ल्ड कप-२०१९" मध्ये खेळण्यासाठी निवड झाली. येत्या १ ते २० जुलै २०१९ या काळात तिचे अंतिम प्रशिक्षण नागपूर येथे होणार आहे. २१ जुलै २०१९ रोजी भारताचा फुटबॉल संघ मुंबई येथून एडिनबरो, (स्कॉटलंड) साठी रवाना होणार आहे. इंग्लंड मधील कार्डिफ आणि वेल्स, याठिकाणी दिनांक २७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
स्नेहालय संस्थेर्तफे चालविण्यात येणाऱ्या बालभवनची ती विद्यार्थिनी आहे. या यशाबद्दल तिचा स्नेहालयात सत्कार करण्यात आला. शुभांगी सध्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात कला शाखेत शिकते. तिचे वडील राजू नगरमधील बस स्थानकात वडा-पाव विकून चरितार्थ चालवितात. शुभांगीची आई प्रीती हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे काम करते. तिला एक भाऊ व दोन बहिणी आहेत.
या सर्व दौर्‍यात व्यक्तिगत खर्चासाठी शुभांगीला अर्थसहाय्याची आवश्यकता आहे. तिला मदत करू इच्छिणाऱ्यांनी 9011026498 येथे संपर्काचे आवाहन बाल भवन प्रकल्पाने केले आहे.