लाखाच्यावर महिला विश्वचषकाच्या प्रेमात

    दिनांक :28-May-2019
तभा ऑनलाईन टीम
लंडन,
लाखाच्यावर महिला क्रिकेट विश्वचषकाच्या प्रेमात पडल्या आहे. एका लाखापेक्षा अधिक महिलांनी 2019 आयसीसी विश्वचषक क्रिकेटच्या तिकिटा खरेदी केल्या आहेत, तर या विश्वचषकादरम्यान सामने बघण्यासाठी प्रथमच दोन लाखांपेक्षा अधिक प्रेक्षक लंडनमध्ये येणार आहे, असा दावा स्पर्धेचे संचालक स्टीव्ह एलवर्थी यांनी केला आहे. 
 
 
क्रिकेटचा हा सर्वात मोठा कुंभमेळा असून याची फलश्रुती अविश्वसनीय आहे. आम्ही 110,000 महिलांना तिकीट खरेदी करताना बघितले आहे. तसेच 16 वर्षांखालील वयोगटातील सुमारे एक लाख प्रेक्षक या विश्वचषकाचे साक्षीदार राहणार आहे व ते विश्वचषकाची रोमांचकता अनुभवणार आहे. हे वर्ल्ड कप युवकांना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहित करेल, असा विश्वासही एलवर्थी यांनी व्यक्त केला.
 
भविष्यातील पिढीला प्रेरणा देण्याविषयी आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा अनया श्रबसोलचा गौरवाने उल्लेख होतो. अनया लहान असताना लॉर्डस्‌ मैदानावरील तारेच्या कुंपणाबाहेरून मैदानाकडे बघायची. यातून तिने क्रिकेट खेळण्याची प्रेरणा घेतली आणि त्यानंतर ती 2017 साली विश्वचषक जिंकणार्‍या इंग्लंड संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू ठरली. आमच्या युवा खेळाडूंसाठी असाच सामना अनुभव मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले.
 
20 वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर विश्वचषक स्पर्धा होत असून ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडण्यासाठी आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन आणि स्पर्धेच्या सुरक्षा संचालकांनी बाराव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची योजना आखली आहे.
 
यंदाची विश्व क्रिकेट स्पर्धा सर्वच बाबतीत अनेक विक्रम मोडण्याची आशा आहे. तिकिटांसाठी 30 लाखांपेक्षा अधिक अर्ज आले असून यात काही वैयक्तिक खेळांकडून 4 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत, असे आयसीसीने म्हटले आहे.
 
आयसीसी विश्वचषक वन-डे क्रिकेट स्पर्धा 30 मेपासून प्रारंभ होणार असून यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या क्रिकेट विश्वमहाकुंभात सहभागी 10 संघ राऊंड रॉबिन पद्धतीने एकमेकांशी सामने खेळणार आहे. या महासंग्रामात 48 सामने रंगणार आहे. अव्वल ठरणारे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.