जंगलात फिरताना दिसला रंगहीन दुर्मिळ पांडा, फोटो व्हायरल

    दिनांक :29-May-2019
चीन नेहमी पांडा या प्राण्यामुळे चर्चेत असते. यावेळी तुम्ही नेहमी पाहता तशा पांडामुळे नाही तर एका दुर्मिळ पांडामुळे चर्चा सुरू आहे. चीनमध्ये पहिल्यांदाच एका रंगहीन पांडाचं चित्र कॅमेरात कैद झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात सिचुआन प्रांतातील वोलोंग नॅशनल नेचर रिझर्व्हमध्ये इंफ्रारेड कॅमेराच्या मदतीने या पांडाचे फोटो घेण्यात आले.
 
 

 
बीजिंगच्या पेकिंग विश्वविद्यालयातील एक अभ्यासक ली शेंग यांनी सीएनएनशी बोलताना सांगितले की, याआधी जंगलात कधीही पूर्णपणे रंगहीन विशाल पांडा असल्याचे आढळले नाहीये. ते म्हणाले की, 'पांडा सुदृढ दिसत होता आणि त्याचे पायही स्थिर होते. यावरू हे लक्षात येते की, जेनेटिक म्यूटेशनमुळे त्याचे जीवन फारसे बाधित झाले नसणार.
 
 

 
पांडा रिझर्व्ह क्षेत्राच्या विकासाचं निरीक्षण करण्यासाठी अधिक कॅमेरे लावण्याची योजना आखली जात आहे. सोबतच या माध्यमातून हे सुद्धा पाहिले जाईल की, हा रंगहीन पांडा या क्षेत्रातील इतर पांडांसोबत कसा संपर्क करतो.
नॅशनल जिओग्राफीनुसार, रंगहीन असलेल्या प्राण्यांमध्ये मेलेनिनची कमतरता असते किंवा त्यांच्या त्वचेचा रंग द्रव्य असतो. त्यांच्या या वेगळेपणामुळे नेहमीच त्यांना जंगलातील शिकाऱ्यांचा अधिक धोका असतो. या प्राण्यांना सहजपणे पाहिलं जाऊ शकतं आणि त्यांच्या डोळ्यांचा प्रकाशही कमी असतो.