औषधांसारखीच काँग्रेसचीही ‘एक्सपायरी डेट’ संपली

    दिनांक :29-May-2019
- अर्थ व वनमंत्री मुनगंटीवार यांची खोचक टिका
अमरावती,
औषधांची परिणामकारकता एका मुदतीनंतर संपते, तशीच काँग्रेसची गत झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर औषधांसारखीच काँग्रेसचीही ’एक्सपायरी डेट’ संपली, असा चिमटा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. 
 
 
शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानाचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधवारी अमरावतीत आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आज देशातील 17 राज्यांमध्ये भाजपाला 50 टक्क्यांच्यावर मते मिळाली आहेत. 20 राज्यात तर काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आहे. त्यामुळे या पक्षातले अनेक नेते भाजपात येण्यासाठी उत्सूक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे लोकप्रतिनिधी, नेते चांगली कामे करतात, अशांना भाजपा-शिवसेना या मित्र पक्षात घेऊन राज्याच्या विकासाच्या गतीत त्यांच्या व्यवहारीक कुशलतेचा लाभ आम्ही घेऊ.
 
मात्र, ज्यांनी 47 वर्षे सत्ता उपभोगली आणि वाईट कामे केलीत अशांना आम्ही कदापी सोबत घेणार नसल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. चंद्रपूरच्या दारूबंदी संदर्भात नवनिर्वाचीत खासदार धानोरकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्दाकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आता काँग्रेसची विचारसरणी बदलत आहे. ‘दारू हटाव’ म्हणणारी काँग्रेस ‘दारूबंदी हटवा’ म्हणत आहे. जनता सर्व पाहत आहे. अशी स्थिती राहीली तर काँग्रेसचा प्रवास कठीण होईल, असे मनुगंटीवार म्हणाले. पावसाळी अधिवेशनाच्यापुर्वी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली.