राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक बोधचिन्हाचे अनावरण

    दिनांक :29-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली, 
समभाग व्यवहारांबाबत देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) प्रमुख निफ्टी 50 सह अनेक निर्देशांकांना नव्या बोधचिन्हासह नवी ओळख देण्यात आली आहे.
 
 
 
राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध 72 समभाग निर्देशांकांसह प्रमुख निफ्टी 50 निर्देशांकाच्या बोधचिन्हाचे अनावरण राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांच्या हस्ते भांडवली बाजाराच्या मुंबई मध्य उपनगरातील मुख्यालयात करण्यात आले. नव्या बोधचिन्हामध्ये एन या इंग्रजी अक्षराचा समावेश असून, त्यात वरच्या दिशेला जाणारा बाण निळ्या रंगात दाखविण्यात आला आहे. नव्या बोधचिन्हाला भांडवली बाजाराचे चलनी नाणे अशा बिरुदाने शाब्दिक रूपात सजवले आहे.
 
 
 
लिमये यांनी सांगितले की, निफ्टी निर्देशांकांनी मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांना भारतीय भांडवली बाजाराची नाडी ओळखण्यास यशस्वी रीत्या मदत केली आहे. पोर्टफोलिओ विविधीकरण, तरलता आणि पुनर्क्षमतेवर लक्ष कें द्रित करीत भारतीय भांडवली बाजाराला सुयोग्य प्रतिनिधित्व प्रदान करण्यात निर्देशांक यशस्वी ठरले आहेत. निफ्टी निर्देशांकांचे हे गुणविशेष नवीन नाममुद्रा ओळखीद्वारे आणखी मजबूत बनविण्यासह, निफ्टी निर्देशांकांचे भारतीय भांडवली बाजारातील हुकमी चलन म्हणून असलेले स्थान भक्कम केले जाणार आहे.
 
निफ्टी नाममुद्रेअंतर्गत विविध 72 प्रकारचे (ब्रॉड बेस्ड, सेक्टोरल, थीमॅटिक आणि स्ट्रॅटेजी) निफ्टी इक्विटी निर्देशांक आणि 90 निफ्टी फिक्स्ड इन्कम आणि हायब्रीड (जी-सेक, एसडीएल, कॉर्पोरेट बॉंड, मनी मार्केट आणि फिक्स्ड इन्कम ॲग्रीगेट्स) निर्देशांकांचा समावेश आहे. या निफ्टी निर्देशांकांचा वापर हा म्युच्युअल फंड योजनांच्या कामगिरीच्या मापनासाठी, निर्देशांक आधारित डेरिव्हेटिव्हजचे व्यवहार, ईटीएफ आणि इंडेक्स फंडांसाठी संदर्भ निर्देशांक म्हणून होत आहे.