रोबोटद्वारे अँजिओप्लास्टीचा जागतिक विक्रम

    दिनांक :29-May-2019
नाशिक, 
अचूक निदान करून कमीत कमी वेळेत अँजिओप्लास्टी करण्यासाठी नाशिकच्या मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूचे संचालक प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा हे रोबोटची मदत घेत आहेत. हा महाराष्ट्रातील पहिला आणि पूर्व आशियातील दुसरा रोबोट आहे. यामुळे नाशिकचे नाव वैद्यकीय क्षेत्रात जगाच्या नकाशावर झळकले आहे. याशिवाय या रोबोटचा वापर करून डॉ. मनोज चोपडा यांनी जागतिक विक्रम नोंदविला आहे. 
 
 
एका रुग्णात सुरुवातीपासून अखेरपर्यंत बंद पडलेली नस रोबोटद्वारे उघडून त्यात 60 मिमी लांबीचा स्टेन्ट यशस्वीरीत्या बसविण्यात येऊन या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. इतक्या लांबीचा स्टेन्ट रोबोटद्वारे बसविण्याची अशी घटना जगात पहिल्यांदा घडली असण्याची शक्यता आहे.
 
मॅग्नम हार्टमध्ये डॉ. मनोज चोपडा यांनी सुरुवातीपासूनच रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार दिले आहेत. आयव्हस एफएफआर, रोटाब्लेटर आणि 4-डी इको आदी तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला आहे. आता या रुग्णालयात अमेरिकेतून कोरिंडस या विदेशी कंपनीचा रोबोट दाखल झाला आहे. मुंबई व पुण्यातील रुग्णालयांमध्येही तो उपलब्ध नाही. महाराष्ट्रात नाशिकमध्येच या रोबोटच्या मदतीने अचूक निदान करून डॉ. चोपडा हे अँजिओप्लास्टी करीत आहेत. रुग्णाची परिस्थिती गंभीर असेल अशावेळी या रोबोटद्वारे अचूक निदान करणे सोपे होते.
 
जलद प्रक्रिया होत असल्याने किरणोत्सर्गाचे प्रमाण कमी होते. रोबोटद्वारे एक मिमीपर्यंतची स्थिती साध्य करता येत असल्याने अचूक जागी स्टेन्ट बसविता येतो. पॉईंट आणि शूट अचूक केले जाते, असे डॉ. चोपडा यांनी सांगितले. अतिशय क्लिष्ट शस्त्रकि‘या रोबोटच्या साह्याने केल्यास शंभर टक्के यशाची खात्री असते. मॅग्नममध्ये अशा पन्नास शस्त्रकि‘या यशस्वी झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. हा एफडीए प्रमाणित अँजिओप्लास्टीसाठीचा रोबोट आहे. नाशिकच्या या रुग्णालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या जगातील दहा रुग्णालयांच्या यादीत स्थान मिळविले आहे.