परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

    दिनांक :29-May-2019
- शिकवणी न लावताच मिळविले होते ५५ टक्के गुण  

 
 
तभा ऑनलाईन टीम
वर्धा,
टक्केवारीच्या मागे धावताना मुलं, मुली बरेचदा जिवाचाही विचार करत नाहीत. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास टोकाचे पाऊल विद्यार्थी उचलतात. असाचं प्रकार वर्धातील अडेगाव इथे घडला. बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. 
 
पूजा विजय भिसे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. देवळीच्या जनता कनिष्ठ महाविद्यालयात पूजा भिसे बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. बारावीचा निकाल असल्याने तिलाही उत्सूकता होती. तिने ऑनलाईन निकाल बघितला. तर पूजाला ५५ टक्के गुण मिळाले होते. कोणतीही शिकवणी न लावता पूजाने हे यश मिळवले. मुलीचे कौतूक करण्यासाठी वडिल विजय भिसे घरी पेढे घेऊन आले. पण, सायंकाळच्या सुमारास पूजाने घरी गळफास लावून आत्महत्या केली आणि पूजा पास झाल्याचा आनंद दु:खात परिवर्तीत झाला. आज पुजाचा मृतदेह वर्धेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.
पूजाच्या आत्महत्येनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.