स्वातंत्र्यवीरांवरील निरर्थक आरोप...

    दिनांक :29-May-2019
स्वत:चा सहिष्णू, उदारमतवादी म्हणून उदो उदो करणारे भारतातील राजकीय पक्ष व विचार, वास्तवात इतके क्षुद्र, अनुदार आणि असहिष्णू असतात की, त्यांना दुसरा विचार िंकवा दुसर्‍यांच्या विचारांचे सहअस्तित्वही सहन होत नाही. अशी वृत्ती असणार्‍यांचे वैचारिक अध:पतन झाले असल्याचे निश्चितच मानले पाहिजे. कॉंग्रेस पक्ष या अशा प्रकारच्या वैचारिक अध:पतनात आणखीनच खाली घसरला आहे, हे देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधी विचारांचे सोडाच, स्वत:च्या पक्षाच्याही काही नेत्यांना कॉंग्रेस पक्षाने वाळीत टाकले आहे. कारण काय? तर, ते नेहरू वा गांधी परिवारातील नाहीत म्हणून. त्यात सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस, नरिंसह राव यांचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. त्यामुळे रसातळाशी वळवळणार्‍या कुत्सित व अत्यंत क्षुद्र मानसिकतेच्या कॉंग्रेस पक्षाकडून, तसेच त्यांनी पोसलेल्या विचारवंतांकडून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अनर्गल आरोप व्हावेत, याचे आश्चर्य वाटावयास नको. स्वातंत्र्यानंतर बहुतेक काळ कॉंग्रेस पक्ष सत्तेवर राहिला आहे. या काळात या पक्षाने भारतातील विविध वैचारिक अधिष्ठानांवर, नेहरू-गांधी घराण्याच्या पायाशी इमान वाहिलेल्यांची नियुक्ती करून, त्यांना िंमधे करून ठेवले आहे. त्यामुळे या सर्व काळात कॉंग्रेसविचारधारेतील, पण नेहरू-गांधी परिवाराशी संबंधित नसलेल्या व्यक्ती, विरोधी विचारसरणीचे नेते यांना कायम उपेक्षित राहावे लागले आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात म्हणा अथवा स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीतील या नेत्यांचे योगदान लोकांसमोर न आणता, ते विस्मरणाच्या खोल गर्तेत कसे जाईल, याचा परिपूर्ण बंदोबस्त या दरबारी विचारवंतांनी केला आहे. परंतु, आज काळ बदलला आहे. नेहरू-गांधी परिवाराचा बटीक झालेला कॉंग्रेस पक्ष धुळीत तोंडघशी पडलेला आहे. अशा वेळी विस्मृतीत ढकललेल्या अनेक राष्ट्रपुरुषांचा सन्मान करण्याची दैवी संधी भारताला मिळाली आहे आणि कृतज्ञ भारत या सर्व राष्ट्रपुरुषांप्रती आपली आदरांजली अर्पण करण्यास सिद्ध झाला आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील हे एक कृतज्ञपर्व आहे, यात शंका नाही. कॉंग्रेसप्रणीत कुचेष्टेच्या या धुळवडीत सर्वात जास्त अपमान सावरकरांच्या वाट्याला आला आहे. एखाद्याचे राजकीय वा सामाजिक विचार पटत नसले, तरी एकूणच राजकीय व सामाजिक चळवळीत त्या व्यक्तीचे योगदान कसे नाकारता येईल? मात्र, हे पाप कॉंग्रेसकडून घडले आहे. एकटे स्वातंत्र्यवीरच नाहीत, तर त्यांच्या संपूर्ण परिवारानेच स्वातंत्र्ययुद्धाच्या होमकुंडात आपली समिधा टाकली आहे. त्याबद्दल तर या देशाने या परिवाराचे कायम ऋणी राहिले पाहिजे.
 
 
 
महात्मा गांधी यांच्या हत्येत स्वातंत्र्यवीरांना (जाणूनबुजून) आरोपी केले असले, तरी सर्वच न्यायालयांनी त्यांना निर्दोष मुक्त केले आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यवीरांच्या हिंदुमहासभेच्या एका कार्यकर्त्याने महात्माजींची हत्या केली म्हणून त्या पक्षाचा अध्यक्ष त्यात कसा काय दोषी राहू शकतो? हाच न्याय मग, 1984 सालच्या शीख नरसंहाराच्या वेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या राजीव गांधींनाही का लावू नये? राजीव गांधी निर्दोष आणि सावरकर दोषी, हे दोगलेपण चालणार नाही. सावरकरांवर आणखी एक आरोप आजकाल वारंवार केला जातो व तो म्हणजे, अंदमानच्या काळकोठडीत असताना त्यांनी ब्रिटिश सरकारकडे माफीनामा पाठविला होता आणि सुटका करण्याची विनंती केली होती. त्यावरून सावरकरांना स्वातंत्र्यवीर न म्हणता माफीवीर म्हणावे, असे खवचट सल्ले देण्यात येत आहेत. असे म्हणतात की, युद्धात आणि प्रेमात सर्वकाही क्षम्य असते. सावरकर तर ब्रिटिशांशी एकप्रकारे युद्धच खेळत होते. अशा वेळी, प्रतिपक्षाला चकमा देऊन आपला कार्यभाग साध्य करणे, यात चूक ते काय? ब्रिटिश सरकारने त्यांना मुक्त केले असते, तर काय सावरकर शांत बसले असते का? उलट स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करून ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले असते. हे न समजायला ब्रिटिश दूधखुळे नव्हते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो माफीनामा फेटाळला. परंतु, या घटनेवरून सावरकर घाबरून ब्रिटिशांना शरण गेले आणि त्यांनी माफी मागितली, असला हलका प्रचार करण्याचे काहीएक कारण नव्हते. ज्या अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात सावरकरांनी यमयातना सोसल्या, त्या तुरुंगाबाहेर भारत सरकारच्या तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी सावरकर यांच्या नावाची गौरवपटि्‌टका लावली होती. परंतु, नंतर आलेल्या सोनिया कॉंग्रेसच्या सरकारने ती काढून टाकली. विरोधी विचाराच्या एका दिग्गज नेत्याबाबत एवढा द्वेष! या वेळी एकाही निष्पक्ष विचारवंताचे रक्त खवळले नाही, हे आश्चर्य आहे. ज्या महापुरुषाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले तारुण्य, असामान्य प्रतिभा अर्पण केली, त्यांना आदर म्हणून त्यांच्या कर्तृत्वाच्या नोंदीसह एखादी पट्‌टी लावण्याचाही अधिकार या देशाला नाही का? सावरकरांनी थोडेच म्हटले होते की माझ्या नावाची पट्‌टी लावा म्हणून! हे तर भारतीयांचे कर्तव्यच होते. कॉंग्रेसने तर हा कृतज्ञपणा दाखविला नाहीच, परंतु कुणी दुसर्‍याने दाखविला तर तोही त्यांना सहन झाला नाही.
आता पुन्हा साध्वी प्रज्ञािंसहच्या निमित्ताने सावरकरांवर विचित्र आरोप होत आहेत. कॉंग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेन्द्र बघेल यांनी तर नवीनच शोध लावला आहे. मोहम्मद अली जिन्ना यांच्यासमक्ष सावरकरांनीच द्विराष्ट्राचा सिद्धान्त प्रथम मांडला होता, असे हे नेते म्हणाले. मुख्यमंत्री झालात म्हणून अक्कलही परिपक्व झाली असे होत नाही, हे या महाशयांनी दाखवून दिले आहे. राजस्थानच्या पुस्तकात, सावरकरांनी स्वत:ला पोर्तुगालचे नागरिक म्हटले होते, असे प्रकाशित केले आहे. कदाचित कॉंग्रेसच्या या लोकांनी गनिमीकावा हा शब्दच ऐकला नसावा. ब्रिटिशांसारख्या चलाख शत्रूशी लढताना, तत्कालिक परिस्थितीनुसार निर्णय सावरकरांनी घेतले असतील, तर भारतीयांना त्याबाबत आक्षेप का असावा, हेच कळत नाही. इतिहास हा कधीही निरपेक्ष नसतो. तो आपल्या संदर्भानेच समजून घ्यायचा असतो. तसे नसते, तर काश्मिरात ठार होणार्‍या अतिरेक्यांना पाकिस्तान सरकारने स्वातंत्र्ययोद्धा म्हटले नसते. आमच्यासाठी परक्यांचा सैनिक ठार होत असतो आणि आमचा सैनिक शहीद होत असतो. एवढीही सामान्य बुद्धी कॉंग्रेसच्या नेत्यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते.
या सर्व मंदबुद्धी कॉंग्रेस नेत्यांनी तसेच सरकारी मलिदा खाऊन पुष्ट बनलेल्या दरबारी विचारवंतांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, स्वत:चे डोळे घट्‌ट मिटले म्हणजे सार्‍या जगात काळोखाचे साम्राज्य सुरू झाले असे होत नाही. सत्य कधी ना कधी समोर येतच असते. त्याला दाबण्याचा िंकवा फिरविण्याचा कुठलाही प्रयत्न तात्कालिक यश देत असला, तरी अंतत: ते सत्य तेजस्वी रूपात बाहेर पडतेच. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अर्थहीन व बालिश टीका कितीही झाली, तरी स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान, देशातील तरुणांना ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात तत्पर करण्यासाठी त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेचा केलेला वापर, हे विसरता येणार नाहीत तसेच ते कुणी विस्मरणातही टाकू शकणार नाही, याची खूणगाठ कॉंग्रेसने बांधून ठेवावी!