कडूनिंब : शेतकर्‍यांसाठी वरदान

    दिनांक :29-May-2019
पर्यावरण शुद्धीकरणात कडूिंलबाचे फार मोठे योगदान आहे. कडूिंलबाचे झाड सतत प्राणवायू वातावरणात सोडत असते. त्याचप्रमाणे वातावरणातील घातक असा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेते. या वृक्षामुळे धूळ व धूर दोन्हीही अडविले जातात. हे झाड सदैव हिरवेगार राहात असल्यामुळे आपणास नियमित घनदाट व शीत अशी सावली मिळत असते. वन विभागातर्फे सामाजिक वनीकरणासाठी ही सर्वोत्कृष्ट वनस्पती/झाड मानले जात असल्यामुळे, घरासमोरील अंगणात, रस्त्यांच्या दुतर्फा, गावठाण, रेल्वे मार्ग, नदी-नाले, कालवे, धरणे, शाळा, प्रार्थनास्थळे इ. ठिकाणी हे झाड लावणे योग्य असते.
 
 
 
बहुउपयोगी असे हे झाड असल्यामुळे कृषिक्षेत्रात या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. निंबोळी किंवा पानांचा अर्क तसेच निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट असे नैसर्गिक कीड, रोग व जिवाणुनियंत्रक आहे. निंबोळी अर्क अर्थात निमार्क किंवा निंबोळी तेलाने अनेक प्रकारचे कीड व रोग नियंत्रित होतात. यामुळे एकंदरीत पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होऊन मातीचा पोत अबाधित राखण्यास मदत होते.
 
संपूर्ण जगभर तसेच भारतात या बहुउपयोगी झाडाचा व त्यामधील घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच निंबोळी व तेलाचा सूत्रकृमी नियंत्रक म्हणूनदेखील उपयोग करता येतो. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी हे एक वरदान आहे. याशिवाय निंबोळ्या व पाल्याचे खतदेखील अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. कडूनिंब वृक्षाच्या पानांमध्ये व बियांमध्ये खालीलप्रमाणे रासायनिक घटक आढळून येतात.
  1. ॲझेडिक्रेटीन : हा घटक साधारणतः 90 टक्के परिणामकारक असून हा घटक किडींना जवळ न येऊ देता त्यांचेमध्ये अपंगत्व आणून त्यांना संपुष्टात आणण्यासाठी क्रियाशील असतो. 1 ग्रॅम बियांमध्ये साधारणतः 2 ते 4 मि.ली. ग्रॅमएवढे प्रमाण आढळते. हा घटक पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. किडींचा जीवनक्रम संपविण्यासाठी हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.
  2. निम्बीसीडीन/ निंम्बीन व निम्बीडिन : विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी हा घटक उपयुक्त असल्याकारणाने या घटकालासुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. पिकांवरील तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो.
  3. नेलीयानट्रिओल : या घटकांचा उपयोग झाडांची व रोपांची पाने खाऊ न देण्यासाठी होतो. या घटकांचा चांगला उपयोग होऊ शकतो.
  4. सालान्नीन : हा घटक पिकांवरील पाने खाणार्‍या किडींवर प्रभाविपणे कार्य करतो. तसेच घरातील माश्या, भुंगे, खवले यावरसुद्धा प्रभावीपणे कार्य करतो.
  5. डिॲसीटील ॲझेडिक्रेटीन : हासुद्धा महत्त्वाचा घटक असून याचे कार्यसुद्धा किडींना प्रभावीपणे दूर ठेवण्यासाठी उपयोगात आणले जाते. एकंदरीत कडूिंलबाच्या पानांपेक्षा बियांमध्ये जैविक क्रिया करणारा घटक अधिक तीव्र आहे.
  6. नियंत्रित होणारे कीटक : मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, हिरवी बोंडअळी, मुंगी प्रजाती, भुंगा प्रजाती, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मक्यावरील खोडकिडा, टोमॅटोवरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी, झुरळाच्या प्रजाती, धान्य साठवणुकीतील किडे, मेंढ्यावरील माश्या इत्यादी किडींचासुद्धा प्रादुर्भाव कमी करणसाठी बहुमूल्य अशा या घटकांचा उपयोग होतो. 
विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी उपयुक्त असल्याकारणाने या घटकाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. पिकांवरील किडी तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती या घटकांमध्ये आढळते. कडूिंलबाच्या अर्काद्वारे किडींच्या नियंत्रणाचा मार्ग : कडूनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंध, अंडीनाशक, कीडरोधक, दुर्गंध रोधक, किडीस खाद्यप्रतिबंधक, कीड वाढरोधक व कीटकनाशक या विविध मार्गाने परिणाम करते. कडूनिंबाच्या सर्व भागापासून विविध प्रकारच्या 400 ते 500 प्रजातींवर प्रभावी वनस्पतिजन्य कीटकनाशक असल्याचे आढळून आले आहे. नियंत्रण कार्याची पुढील माहिती शेतकर्‍यांच्या विशेष फायद्याची ठरू शकते.
क्रमशः