पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीनही आरोपींना अटक

    दिनांक :29-May-2019
मुंबई ,
 
नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तीन आरोपींना अखेर अटक करण्यात आले आहे. डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल अशी या आरोपींची नावे आहेत. डॉ भक्ती मेहेरला मंगळवारी दुपारी सेशन कोर्टच्या बाहेरून अटक केली होती तर डॉ हेमा आहुजाला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली तर तिसरी आरोपी डॉ. अंकिता खंडेलवालला देखील पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
 
 

 
 
 
 
या तिघींविरोधात अॅट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तिघींनाही आज कोर्टात हजर केले जाणार आहे. या वरिष्ठ डॉक्टर पायलचा सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून पायलने 22 मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली.
 
 
 
 
डॉ. हेमा आहुजाला रात्री अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती. आता या तीनही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी तिनही आरोंपीविरोधात अँटी रॅगिंग अॅक्ट आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी सखोल आणि कडक तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना दिले आहे. तसेच आठ दिवसांच्या आत तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेशही दिला आहे.