ट्रॅक्टर पलटून मजुराचा मृत्यू

    दिनांक :29-May-2019
मोहाडी, 
नवीन विद्युत लाईन टाकण्याकरिता सिमेंटचे खांब वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने त्याखाली दबून एक मजूर जागीच ठार झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना परसवाडा गावाजवळ घडली. सदर घटना परसवाडा गावाजवळ आज बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.  
 
 
खरबी येथून परसवाडा मार्गे माडगीच्या दिशेने सिमेंट खांब घेऊन जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक एमएच ४०/एल २२७१ ची ट्रॉली परसवाडा गावाजवळ आज सकाळी १० वाजताच्या सुमारास पलटली. ट्रॉलीवर बसलेल्या दोघा मजुरांच्या अंगावर सिमेंट खांब पडले. यात विजय बडवाईक (४०) रा. खरबी याचा जागीच मृत्यू झाला तर वीरेंद्र तुमसरे रा. खैरी (बालाघाट) हा गंभीर जखमी झाला. त्याला भंडारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.