वडणेर जवळ अपघातात एकाचा जागीच मृत्यू, चौघे जखमी

    दिनांक :29-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
मलकापूर,
नांदेड येथून अजमेरला दर्शनासाठी जाणाऱ्या नांदेड येथील भाविकांच्या कारला नांदुरा तालुक्यातील वडणेर भोलजी नजीक ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास घडली. 

 
 
नांदेड येथील विश्वास संबरराव देवसरकर , गजानन शंकरराव देवसरकर , लक्ष्मणराव किसनराव देवसरकर , भारत किसनराव देवसरकर व चंद्रमनी मेहसराम सावनकर सर्व रा दादगाव नांदेड हे स्विफ्ट डिझायर कार क्र एम एच ४७ सी ७४९८ ने अजमेर कडे जात असतांना त्यांच्या कारला राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील वडणेर नजीक ठाकूर पेट्रोल पंपाजवल ट्रक क्र एम पी ०९ एच जी ५५९९ ने जोरदार धडक दिली.
 
या अपघातात विश्वास संबरराव देवसरकर वय ३५ यांचा जागीच मृत्यू झाला तर गजानन देवसरकर , लक्ष्मणराव देवसरकर ,भारत देवसरकर व चालक चंद्रमनी सावनकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . घटनेचे वृत्त कळताच मलकापूरचे नगराध्यक्ष अँड हरीश रावळ, मनसे परीवहनचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा पाठविण्याची व्यवस्था केली. अपघातातील मृतक व जखमी एकाच परिवारातील असून ते नांदेड येथून रात्री दहा वाजता अजमेरला जाण्यासाठी निघाले होते.