निवृत्तीचा निर्णय हा धोनीच योग्यवेळी घेईल : शेन वॉर्न

    दिनांक :29-May-2019
विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना, भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी फॉर्मात परतला आहे. बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात धोनीने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. काही महिन्यांपूर्वी धोनी फॉर्मात नसताना, त्याच्यावर निवृत्तीचा दबाव वाढला होता. अनेक माजी खेळाडूंनी धोनीने निवृत्ती स्विकारावी असाही सल्ला दिला होता. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या मते निवृत्तीचा निर्णय हा धोनीच योग्यवेळी घेईल. यासाठी त्याला सल्ल्याची गरज नाही.

 
 
 
 
“महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं आहे. मध्यंतरी काही लोकांकडून त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव टाकण्यात येत होता ही गोष्टच मला पटली नाही. निवृत्ती कधी स्विकारायची याबाबत धोनीच निर्णय घेऊ शकतो आणि ती वेळ त्याला नक्की माहिती असेल. मग ती विश्वचषक संपल्यानंतर असो किंवा स्पर्धेनंतर ५ वर्षांनी असो, आपल्या निवृत्तीची वेळ ठरवण्याचा अधिकार धोनीला आहे.” शेन वॉर्न IANS वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.