गायिका सोना मोहापात्राला जीवे मारण्याची धमकी

    दिनांक :29-May-2019
मुंबई:
सलमान खानवर टीका केल्याने गायिका सोना मोहापात्राला सलमानच्या फॅन्सनी त्रास द्यायला सुरुवात केलीय. सलमानच्या एका चाहत्याने तर तिला चक्क जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोना मोहापात्रानं या धमकीच्या मेसेजचा स्क्रिनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
 
सोना मोहापात्राला सलमानच्या एका फॅननं धमकी देणारा मेल पाठवलाय. या मेलमध्ये त्यानं लिहिलंय की, 'तू पुन्हा एकदा तोंड उघडलंस आणि सलमानबद्दल काही बरळलीस तर मी तुझ्या घरी येऊन तुझा जीव घेईन. मी तुला देत असलेली ही पहिली आणि शेवटची संधी आहे' अशी धमकी त्याने दिली आहे. सोनाने या मेलचा फोटो शेअर करत सलमान खान आणि त्याच्या फॅन्सवर पुन्हा एकदा टीका केलीय. 'सलमानच्या फॅन्सकडून मला अशा धमक्या सतत येत असतात. दुसऱ्यांना वाईट कृत्यांसाठी प्रेरित करणारा माणूस 'भारत' हे बिरूद लावून फिरतोय हेच लाजीरवाणं आहे ' असं ट्विट तिनं केलंय.
दरम्यान, सलमाननं आगामी 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत प्रियांकाला टोमणा मारला. प्रियांकानं चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यास होकार देऊन लग्नामुळे चित्रपट सोडला याविषयी बोलताना सलमान म्हणाला की, 'प्रियांकानं निक जोनससोबत लग्न करण्यासाठी इतका मोठा चित्रपट सोडला, एरव्ही इतका बिग बजेट चित्रपट मिळाल्यावर अभिनेत्री त्यांच्या पतीला सोडतात'...सलमाननं प्रियांकाबाबत केलेलं हे विधान गायिका सोना मोहापात्राला खटकलं आणि तिनं ट्विटच्या माध्यमातून सलमानवर टीका केली. 'प्रियांकानं चित्रपट सोडला कारण तिला आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, प्रामाणिक आणि सच्च्या माणसासोबत आयुष्य काढायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या प्रवासानं अनेक मुलींना प्रेरणा द्यायची आहे' असं ट्विट करत तिनं प्रियांकाची बाजू घेतली होती.