सामना नकारात्मक विचारांचा...
   दिनांक :03-May-2019
नैराश्याचा सामना करणार्‍या अनेकांच्या मनात नकारात्मक विचार घर करतात. यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतोच शिवाय टोकाचं नैराश्य येतं. सर्वसामान्य माणासाला नकारात्मक विचारांचा सामना करणं तुलनेने सोपं जातं पण आयुष्यात आधीच नैराश्याशी झुंजणार्‍या लोकांमध्ये नकारात्मक विचारांमुळे अस्वस्थता, अनामिक भीती आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. नैराश्य आलेल्यांसाठी नकारात्मक परिस्थिती आणि विचारांचा सामना करणं प्रचंड आव्हानात्मक असतं. नैराश्याशी लढताना नकारात्मक विचारांचा सामना कसा करावा याविषयी...
 

 

  • तुमचे विचार लिहून काढा. यामुळे आपल्या मनात नेमकं काय चाललं आहे, याचा अंदाज येतो. नकारात्मक परिस्थिती आणि विचारांचा सामना करण्याचं बळ मिळतं. विचार मांडताना स्वत:शी प्रामाणिक राहा. लिखाणामुळे विचार प्रक्रिया समजून घेणं सोपं जाईल.
  • शारीरिक आरोग्य जपा. शारीरिक आरोग्य उत्तम असलं की मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. तुमच्या दिनक्रमात व्यायामाला स्थान द्या. आरोग्यदायी, पोषक पदार्थांचा आहारात समावेश करा. जीवनशैलीत बदल करून आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. यामुळे मानसिक आरोग्यही सुधारेल.
  • नैराश्य आणि नकारात्मकतेचा सामना करणं शक्य नसेल तर तज्ज्ञमंडळींची मदत घ्या. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नैराश्याची समस्या दूर होऊ शकते तसंच झोप न येणं, थकवा अशा समस्यांचा सामना करणंही शक्य होतं.
  • नैराश्य आणि ताणामुळे तुम्ही अस्वस्थ होता, थकवा येतो. त्यामुळे दिवसातला काही काळ स्वत:साठी ठेवा. आठवड्यातून एकदा स्पामध्ये जा. एखाद्या दिवशी मस्त आंघोळ करा, गाणी ऐका. डान्स करा. आवडीचं काहीही करा. झोपण्याआधी हॉट चॉकलेट किंवा गरमागरम कॉफी घेता येईल. यामुळे तुम्ही मस्त रिलॅक्स व्हाल.
  • तुमच्या विचारांचा सामना करायला शिका. विचार दूर घालवण्याचा किंवा त्यापासून पळण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे अशा विचारांची भीती वाटणार नाही. अशा विचारांचा फार प्रभावही पडणार नाही.