उन्हाळा आणि पाळीव प्राणी
   दिनांक :03-May-2019
घराची गोष्ट
अवंतिका तामस्कर  
 
उन्हाळा आपल्या सख्यासोबत्यांसाठी जास्तच त्रासदायक असतो. तो सुसह्य करायला मदत करूया. आता कुठे मे महिना सुरू झालाय्‌, पण या वर्षी उन्हाने चांगलाच दणका दिलाय्‌. बाहेरच्या उन्हातून घरात आल्यावर पंख्याचे बटण दाबून सुखाने गार वारा घेता येतो. अजून थंड व्हायचे असेल तर एसी आहेच.
 
पण इतर प्राणी मात्र त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने उन्हाला तोंड देताना दिसतात. या चटक्याला तोंड न देता आल्यास मृत्युमुखी पडत आहेत. मुक्त जनावरांपेक्षा पाळीव जनावरांचे हाल जरा कमी असतात. हौसेने पाळलेल्या कुत्रा, मांजर, पक्षी यांच्याकडे आपण उन्हाळ्यात विशेष लक्ष दिले पाहिजे. उन्हाळा हा प्राणीमालकांच्या काळजीचा काळ असतो. ज्यांच्या अंगावर दाट केस आहेत, अशा कुत्र्यांना उन्हाचा जास्त त्रास होतो. तसेच लहान पिल्लांना उन्हाळा लवकर बाधतो. उन्हाळा सुरू झाला की प्राणी कमी जेवतात. त्यांना शक्यतो सकाळी लवकर किंवा रात्री जेवायला द्यावे. उन्हात फिरायला नेणे कटाक्षाने टाळले पाहिजे. कुत्र्यांना रोज आंघोळ घालण्यापेक्षा ओल्या फडक्याने पुसून त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवता येईल. पक्षी पाळले असल्यास पिंजरा दिवसभर सावलीत राहील, तसेच हवा खेळती राहील, अशा ठिकाणी ठेवावा. शक्यतो आडोसा करावा.
 
 
 
घरात ऍक्वेरिअम असेल तर पाण्याची पातळी कमी होत नाही ना, याकडे लक्ष द्यावे. थेट फिशटँकमधील पाणी तापत तर नाही ना हे पाहिले पाहिजे. हे झाले आपल्या लाडक्या पाळीव सवंगड्यांचे! पण सर्वसामान्य प्राणी, पक्षी जगत उन्हाला तोंड कसे देतात हे पाहणे गमतीशीर आहे. खरे तर निसर्गसाखळीत कमीत कमी ढवळाढवळ करणे हे निसर्गसंवर्धनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. निसर्ग आपोआप बदलत्या परिस्थितीशी हळूहळू जुळवून घेत पुढे जात असतो.
 
तापमान वाढल्यास आपल्याला घाम येतो. घाम त्वचेवर बाहेरच्या उष्णतेने वाळतो आणि या प्रक्रियेत शरीराला थंड करतो. अगदी माठातील पाणी जसे गार होते तसे. घोडासुद्धा याच पद्धतीने आपले शरीर गार ठेवतो.
प्रचंड आकारमान असलेल्या हत्तीला स्वतःला गार ठेवण्यासाठी वेगळीच पद्धत वापरावी लागते. हत्तीला कान हलवताना पाहिले असेल ना, तीच ती आयडिया! त्याच्या भल्याथोरल्या कानांमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते. कान हलवताना शरीरातील उष्णता हवेत मिसळते व रक्त थंड होते. हे थंड झालेले रक्त शरीरात फिरून शरीराचे तापमान आटोक्यात ठेवते. अगदी हीच पद्धत मोठे कान असलेले ससे पण वापरतात. म्हणजे त्यांचे कान मोटारीमधील रेडिएटरसारखे कार्य करते.
 
सगळ्यांनाच असे जमत नाही. सरडे, पाली, साप यांना उन्हाचा खूप त्रास होतो. काही तास जरी ते तीव्र उन्हात राहिले तर मृत्युमुखी पडू शकतात. अशावेळी ते ऊन्ह तापायच्या आत दगडाच्या खाली किंवा पारीत थंड ठिकाणी स्वतःला लपवतात.
उन्हाळ्यात कुत्र्याला जीभ बाहेर काढून बसलेले नेहमी पाहतो. ही त्याची शरीर गार ठेवण्याची खास पद्धत आहे. घाम येत नसल्याने कुत्रा शरीरातील हवा बाहेर टाकून शरीर गार ठेवण्याचा प्रयत्न करतो. उन्हाळ्यात बरेचसे पक्षीसुद्धा आपली चोच उघडी ठेवून तापमान नियंत्रित ठेवतात.
 
डुक्कर किंवा म्हैस चिखलात लोळतात आणि अंगाला लागलेला चिखल वाळण्याच्या प्रक्रियेत त्यांचे शरीर गार करतो. स्टॉर्क आणि गिधाडे अगदीच वेगळया पद्धतीने शरीर गार करण्याचा प्रयत्न करतात. ते त्याची पाण्यासारखी विष्ठा पायावर टाकतात आणि त्या गारव्यातून शरीर थंड करतात. एकंदरित निसर्गाकडे त्यांची त्यांची सोय आहे. मानवानेच निसर्गाशी नाते तोडले असल्याने आपल्याला कृत्रिम उपायांची गरज पडते. जाऊ दे! मस्तपैकी एसी लावून निसर्गाची वाट लावत हा उन्हाळा गारेगार होत घालवूया.