रहाटाला गती दिलीय्‌ मी...
   दिनांक :03-May-2019
मी सध्या काय वाचते?   
 आशा पांडे 
 9422207925
 
चराचर सृष्टीमध्ये वसुंधरा ही एक जन्मदात्री. मानवदेही स्त्री ही दुसरी जन्मदात्री आणि विचित्र योग असा की, या दोन्ही जन्मदात्रींचे हृद्गत कोणीही जाणत नाही. रवीन्द्रनाथ टागोर म्हणतात- Inscrutable are the ways of a women's heart. हे असे का? हा प्रश्न सुटलेला नाही. त्याकरिता स्त्रीला देवीचा मान देण्यापेक्षा उचित सन्मान, उचित स्थान देणे गरजेचे आहे, तिच्या स्त्रित्वाची जपणूक होणे, त्याची योग्य जाण असणे महत्त्वाचे आहे. संस्कृतीच्या संकल्पना, जीवनमूल्ये, रूढी-परपरांमध्ये कालसापेक्ष बदल झालेत. पण स्त्री? ती तशीच राहून गेली. दुय्यम दर्जा, पुरुषावलंबीत्व, बेगडी स्वातंत्र्य- सारे तसेच आहे. बाह्यात्कारी बदल अंतरीची तगमग वाढविणारे ठरताहेत. म्हणूनच तिचे दु:खही बहुपेडी झाले आहे. समाजातल्या भिन्नस्तरीय स्त्री जीवनात या अंतर्वेदनेचे रूपही वेगवेगळे आहे. पण, सर्वत्र एक साम्य आहे- वेदनेचे अव्यक्त असणे, अनाकलनीय असणे.
 
या मुक्या वेदनेला, या अव्यक्त घुसमटीला व्यक्त करत असतानाच तिला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे कवयित्री आसावरी काकडे यांनी. ‘रहाटाला गती दिलीय्‌ मी’ काव्यसंग्रहातून आपली भूमिका स्पष्ट करताना लिहितात- ‘जगण्याचे रहाटगाडगे फिरत राहते. एकेक गाडगे भरत जाते, एकेक रिकामे होत जाते. पुन्हा भरते, एका नव्या आकलनाने आणि ते भरले गेलेले गाडगे माझ्या शेतीत रिकामे करून रहाटाला पुन्हा गती दिलीय्‌ मी...’
 
ही गती बदलत्या काळानुसार स्त्रीला बदलता यावे, हे बदल तिला पूर्णपणे कळावे व तिने ते बुद्धिनिष्ठ तर्कसंगतीने स्वीकारावे, त्यांचे तिला ओझे होऊ नये, ही आव्हाने पेलण्याची ताकद तिच्यात यावी, म्हणून हे वैचारिक रहाट पुन्हा फिरवले जात आहे. तिच्या अस्तित्वावर ओरखडे काढणार्‍या परिस्थितीशी झुंज देण्याचा पोक्त सल्ला देणारी ही कविता आहे-
‘आपल्या उडण्याचा, अलिखित हक्क असलेल्या अवकाशात, उड्डाणपुलाचे आक्रमण झाले, तरी भिरभिरत राहणे, अधिक उंचीवरून.’
 
स्त्रीला अलगदपणे उंचीवर नेणारी ही कविता स्त्रीमनाची उकल करणारी आहे. विचारप्रधान लेखन असल्याने निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा संबंध मानवी जीवनाशी जोडला गेला आहे. ही एकात्मताही आत्मसात केली, तरी या दोन जन्मदात्रींचे नाते दृढ होईल. पाऊस म्हणजे धरणीच्या अपेक्षा पूर्ण करणारा जलदूत. धरणी सचैल होते, पण अंतिम परिणामाची एक आगळीच भीती तिला थरथरायला लावते. स्त्रीचे मनही असेच. म्हणून ‘सगळ्याची कालवाकालव, गडप त्वचेच्या आत!’
 
हेे त्वचेच्या आतले स्पंदन आहे, ते अत्यंत हळुवार, नाजूक जाईच्या फुलासारखे. हसताहसता डोळ्यांमध्ये येणारे पाणी असेच स्तंभित करणारे. स्त्रीचे मन कधी निश्चिंत नसते, कधी निवांत नसते. सासरी गेलेल्या मुलीची िंचता, परगावी असलेल्या मुलाची ओढ, मागे राहिलेल्या माहेरच्या आर्त आठवणी तिला व्याकूळ करतात. खरेच ‘सुख धपापत राही, लेकीच्या आईचे... कुणी घडवले असे प्राक्तन बाईचे?’ हा प्रश्न प्रत्येक स्त्रीला पडतो, पण उत्तर मिळत नाही. कारण ते तिच्या मनाच्या भावनिक गुंत्यात गुंतले असते, रानजाळीतल्या फुलासारखे.
 
हे रानजाळीतले फूल खुडण्याचे बळ तिच्या हातांना मिळेल, ही आस तिला आहे. मुळात स्त्री आशावादी असते. म्हणूनच ती सगळी स्थित्यंतरं सहन करत पुढे येऊ शकली. पण, तिला स्वत:लाच तिच्या अंत:स्थशक्तीला ओळखता आलेले नाही. ती कोण आहे, हा शोध तिनेच घेतलेला नाही. स्‌ त्‌ र्‌ या तीन व्यंजनांना ई ने जोडले की शब्द होतो स्त्री. स म्हणजे सतोगुण, त म्हणजे तमोगुण आणि र म्हणजे रजोगुण, ई म्हणजे ईशत्व. तिन्ही गुणांच्या समुच्चयाला ईशत्वाकडे नेते ती स्त्री. हे तिचे खरे रूप तिला कळायला हवे, तिचे आत्मभान जागायला हवे. ही मोलाची भूमिका हा कवितासंग्रह पार पाडतो. संग्रहातली स्त्री जाणती झाली आहे. म्हणून तिला वाटते की-
त्यांना माहीत नाही, कदाचित्‌, तिलाही कळलेले नाही अजून,
की तिला सापडेल स्वत:चा गंध असलेला अंत:स्वर,
तेव्हा लागणार नाही तिला, कुणी पार्श्वगायक,
कसले आरक्षण, कुणाचे निमंत्रण...
कालपुरुष किती निब्बर झालाय! त्याला स्त्रीच्या विटंबनांचे, वेदनांचे, विवशतेेचे काहीच वाटत नाही. त्याच्या व्यवस्थेत निर्दोष सीतेला वनवास भोगायला लावणारा राम आदर्श राजा ठरतो. अशा वेळी समाज ‘काळाचे तंग पांघरूण, ओढून अंगावर, पडून राहतो शांत!’ ही समाजव्यवस्था पुरातन आहे. आधुनिकही आहे. नऊवार पातळातली स्त्री सलवार-कमीजमध्ये, जीन्स-टॉपमध्ये दिसते आहे. वेषांतर झाले आहे, पण मन्वन्तर नाही. कारण त्या काळपुरुषाला ‘काहीच दिसत नाही, ऐकू येत नाहीत त्याला कुठलेच आक्रोश, कुणाचेच आकांत.’
 
अशा या कठोर काळाला कवेत घ्यायचे असेल, तर आपल्याला सगळी शक्ती एकवटून प्रखर व्हावे लागेल, प्रचंड व्हावे लागेल. जाणिवांच्या अँटीनावर साचलेली धूळ, धुळीचे थर उतरवावे लागतील. तेव्हाच आपल्याला दिठीपल्याडचे जग दिसेल. आत्मप्रचीती येईल. अन्यायाचा विरोध करता येईल, अबलांना सबला करता येईल. दारू पिऊन मारझोड करणार्‍या नवर्‍याला वठणीवर आणण्याचे बळ स्त्रीला मिळेल. वर्तमानातला संघर्ष ही त्याचीच पूर्वतयारी आहे. ‘काल-आजच्या संधिकाळात तरी, मुक्त भिरभिरता यावे तिला, पाखरासारखे, मुक्त!’ मुक्त जगणे एक स्वप्नच ठरते, कारण तृप्ती-अतृप्तीचा विचित्र खेळ प्रत्येकाच्या मनात सुरू असतो. अशा गोंधळलेल्या मनाला सत्य तेच स्वीकारण्याचा प्रांजळ सल्ला ही कविता देते. निबिड अंधारासारखा प्रखर उजेडही जग गिळून टाकतो, हे सत्य सांगणारी ही कविता स्त्रीला सावध करणारी आहे. कवितासंग्रहाचे नावच ही भूमिका स्पष्ट करणारे आहे. रहाट हे लाकडी साधन विहिरीतून पाणी काढण्यासाठी प्राचीन काळी वापरले जाई.
 
ते दोन्ही हातांनी फिरवावे लागायचे. रहाट म्हणजे प्राचीन काळ, स्त्रीचं भावगर्भ मन म्हणजे खोल विहीर, कवयित्रीचे विचार म्हणजे रहाटाला बांधलेला दोर, लेखणी म्हणजे बादली आणि शब्द म्हणजे पाणी. प्राचीन काळापासून तुंबलेल्या विहिरीला-स्त्रीमनाला कवयित्रीने नवीन विचारांनी हलवण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेत मोलकरणीचे दु:ख आहे. वेश्येचे विषाद आहे, पतिव्रतेचे मूक आक्रंदन आहे. ती स्पष्टपणे सांगते की, ‘तडजोड करावीच लागते, विषारी हवेशी.’ ही तडजोड करण्यासाठी बुचाच्या झाडासारखी तटस्थ वृत्ती असावी लागते. तटस्थपणा आला की कणखरपणा येतो आणि अगतिकता संपुष्टात येते. याचा प्रत्यय येतो ‘तिसर्‍यांदा नाळ तुटते आहे’ या कवितेत.
 
जगण्याचे अत्यंत व्यवहारी विश्लेषण करणारी ही कविता बोधकविता आहे. अनेक प्रश्नांचं एक अचूक उत्तर आहे. यात आईने मुलाला संसार यशस्वी करण्याचा नेटका सल्ला दिला आहे. स्वत:ला बाजूला करताना होणारी घालमेल प्रत्येकीच्याच वाट्याला येते. अशा वेळी शोधावे लागते ‘मोरपीस मिळण्याचे ठिकाण.’ हे ठिकाण भावार्त मनाला नक्की सापडते जेव्हा स्त्रिया ‘वाट करून देत होत्या, सगळ्या अनावर क्षणांना, हरिनामाचे दार उघडून, मुक्त होऊ पाहात होत्या.’ अशी शांत झालेली स्त्री सगळी तगमग संपवू शकते. तिला निर्विवाद क्षणांची चाहूल लागते. जेव्हा ती ‘पाठ वळवते, नजर झुकवते तेव्हा रात्र होते, ताठ मानेने, सामोरा जाते आयुष्याला तेव्हा दिवस उगवतो.’
 
इतकी सुंदर व्याख्या देणारी ही कविता नवा अर्थबोध देणारी, नवी दिशा दाखवणारी आहे. संवेदनाशून्य, भिजलेलं जगणं म्हणजे ‘पोट्रेट’ ही अर्थगर्भ कविता पुन्हा विचार करायला लावते. आभासमान जगाची जाणीव करून देणारी कविता सावधपणाचा इशारा देते. माणसाला आपलेपणाची आत्यंतिक गरज आहेच. ‘किती दिवसांनी भेटतात’ ही आत्मीय तक्रार मनाला सुखावून जाते. शेवटी मनाला भावनेचा ओलावाच मोलाचा वाटतो. या ओलाव्यानेच मन मोहरते, ‘नव्याने जगावे वाटू लागते.’
 
सुखदुःखाच्या िंहदोळ्यावर आंदोळणार्‍या आयुष्याशी संवाद साधणारी ही कविता आहे. सगळ्या आरोह-अवरोहांचा मथितार्थ समजून घेत जगण्याचा आग्रह ती धरते. शहाणपण आणि नाइलाज यातले सूक्ष्म अंतर कळावे, मनाने तेवढे सतर्क असावे, असेही ती खुणावते. प्रश्न संपत नसतात, काही प्रश्नांना उत्तरं सापडत नसतात, हे वास्तवही ती स्वीकारते. आयुष्य उतरणीला लागलं की सगळे डाव संपवावेसे वाटतात. ‘खेळ’ या कवितेत हे कटुसत्य समोर येते.
 
माणसं वेगवेगळ्या प्रकृतीची, प्रवृत्तीची, वृत्तीची असतात. एखादे झाड फळं, फुलं देऊन थकते, तर एखादे निर्बीज राहते. एखादी सर कोसळते, एखादी आवेग पिऊन टाकते. एखादा रस्ता पोचतो मुक्कामाला, तर एखादा नुसतीच वळणं घेतो. एखादे आभाळ बरसून मोकळे होते, तर एखादे मिटूनच बसते. जे निःशब्द राहतात त्यांना मौनाचेही ओझे होते. शब्द आणि निःशब्दाची सांगड घालता यायला हवी, हे त्या कवितेतून सुचेवावेसे वाटते. जन्म-मृत्यूच्या क्षणी माणूस एकटा असतो, हे चिरंतन सत्य असले, तरी प्रत्येकाला आयुष्यभर सोबत हवी असते. तीही फक्त ‘माझ्यांची.’ ‘मी आणि माझे’च्या विळख्यात स्त्री सदैव अडकलेली असते. पानं गळाली तरी फांदी झुुलतच असते. जगण्याची उमेद असल्यानेच ती इतरांना जगवू शकते. आसक्ती असल्यानेच ती आस्तिक बनते- सारंकाही जपते, सार्‍यांना फुलवते. ‘अर्पण करू’ ही समारोपाच्या क्षणाची कविता. प्रार्थनावृत्ती निर्माण होते. प्रगल्भपणा येतो, समग्रतेचे दान करावेसे वाटते, ऊहापोहात अडकलेले आयुष्य निर्विकल्प व्हावेसे वाटते, जगण्याची परमावधी मुक्त होण्याच्या क्षणांची सुरवात असते.
 
असं हे स्त्रीमनाचं आकलन. कधी गूढ, कधी तरल, कधी उदात्त, कधी घनव्याकूळ, चंद्राला शोधणारं, अस्तित्वाच्या खुणा पुसणार्‍या प्रखर प्रकाशाला घाबरणारं.
शब्दांना खिळे ठोकून आशय बंदिस्त करता येत नाही, तद्वतच रूढी-परंपरांच्या बेड्या अडकवून चालणे थांबवता येत नाही. खिळे उपटण्याचे, बेड्या झुगारण्याचे बळ दृढ इच्छाशक्तीत आहे. ती जागविण्याची गरज असते. त्याकरिताच असे लिखाण मार्गदर्शक ठरते. ते प्रत्येकीने वाचावे.