दानवेंच्या जावयासाठी नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपाचे प्रयत्न

    दिनांक :03-May-2019
मुंबई: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई तथा शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितिंसह ठाकूर यांनी केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी भाजपाच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी प्रयत्न करीत युतीधर्माचे पालन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचनेवरून आपण स्वत: या मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करून खैरे यांच्या विजयासाठी भाजपा नेते कार्यकर्त्यांशी संपर्क करून पत्रपरिषद घेऊन जाहीर आवाहनही केल्याचे त्यांनी सांगितले.
 

 
 
भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे जावई आ. हर्षवर्धन जाधव या मतदारसंघात उमेदवार आहेत. जाधव यांना प्रदेशाध्यक्षांचा पािंठबा असल्याचा गैरसमज काही जणांनी निर्माण केला होता. मात्र आपण पत्रपरिषदेत जाहीरपणे पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आणि संभ्रम निर्माण करणार्‍यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांच्यावर भाजपासोबतच शिवसेनेचेही कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा निवडणूक काळात सुरू होती. त्यामुळे दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत करण्यासाठी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. मात्र या चर्चेचा परिणाम युती धर्मावर होऊन त्याचा फटका आगामी विधानसभेच्या निवडणुकीत होईल, या भीतीने भाजपाकडून हा खुलासा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या लढाईचा फायदा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची चर्चा औरंगाबादेत रंगली आहे.