नक्षली हल्ल्याचा बदलाच हवा!
   दिनांक :03-May-2019
 
देशात एकीकडे नवे सरकार निवडून देण्यासाठीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना, देश जागतिक कामगार दिन साजरा करीत असताना आणि महाराष्ट्र त्याच्या स्थापनेचा उत्सव साजरा करण्यात मग्न असताना नक्षलवाद्यांनी डाव साधून गडचिरोलीत केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले. देशाच्या निवडणुका सुरळीत पार पडाव्या, देशात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, ग्रामीण भागातील जनतेलाही न्याय मिळावा, केंद्रीय योजना सुदूर खेडोपाडी पोहोचविण्यात अडचणी येऊ नयेत आणि जनतेच्या जानमालाचे रक्षण व्हावे, यासाठी झटणार्‍या पोलिस जवानांचा नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यू व्हावा, यासारखी निंदनीय बाब ती कोणती म्हणावी? म्हणून या घटनेचा जेवढ्या तीव्र शब्दांत निषेध करावा तेवढा कमी आहे. देशातील नक्षलवाद, दहशतवाद, माओवाद कमी करण्यात केंद्र आणि राज्य शासनाला यश येत असताना, नक्षलवाद्यांची पळता भुई थोडी झाली असताना, केवळ आपले अस्तित्व दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे कृत्य केलेले आहे. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून नक्षल्यांविरोधात सुरू केलेल्या अभियानामुळे देशभरात या चळवळीचे कंबरडे मोडले आहे. आजवर देशातील जवळपास 100 जिल्ह्यांमध्ये जाणवणारी नक्षलवाद्यांची उपस्थिती आता केवळ 30 ते 35 जिल्ह्यांपुरतीच मर्यादित राहिली आहे. विविध राज्यांमध्ये सत्तेवर आलेल्या सरकारांनी नक्षलवाद्यांबाबत कठोर धोरण स्वीकारल्यामुळे त्यांची आश्रयस्थाने लोप पावू लागली आहेत, तरीदेखील नक्षलवादी काही ऐकण्यास तयार नाहीत. त्यांचा सरकारच्या कामांना विशेषतः आदिवासी, दुर्गम भागातील विकास कामांना विरोध आहे. मूठभर का असेना, नक्षलवादी हिंसक  कारवायांचा आश्रय घेतात आणि खेडोपाडी दहशत निर्माण करून नवतरुणाईला त्यांच्या चळवळीकडे आकर्षित करतात. नक्षलवाद्यांना येणारा पैसा, निरनिराळ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी संघटनांशी त्यांच्या जुळलेल्या तारा, या काही नव्या नाहीत. त्यांची रसद तोडण्यासाठी सरकारने अनेकवार प्रयत्न केले आहेत.
 

 
 
या चळवळींना हवालामार्गे पैसा मिळत असल्याचे सिद्ध झाल्याने नोटबंदीसारखे निर्णय घेतले गेले आणि हिंसक कारवाया घडवून आणणार्‍यांना रोख रकमा मिळणे बंद झाले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. या पार्श्वभूमीवर कालच्या नक्षली हल्ल्यामुळे जनमानस पुन्हा क्षुब्ध झाले आहे. पुलवामात 42 जवान शहीद झाले होते, गडचिरोलीत 15 पोलिस जवान शहीद झाले आहेत. शहीदांचा आकडा कमी असला म्हणून या हल्ल्यामुळे निर्माण झालेली आव्हाने कमी होत नाहीत. राज्यात महाराष्ट्रदिनाचा महोत्सव सुरू असताना, राजधानी मुंबईपासून दूर गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी हा सुरुंगस्फोट घडवून सरकारला, आम्ही अजून पूर्णतः संपलेलो नाही, हे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रदिनी मध्यरात्री सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल 36 वाहने जाळल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली होती. पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, या कामासाठी एका खाजगी कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट व दोन कार्यालये आहेत. दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी गावभर शासनाविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर्स लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली. या आगीत 11 टिप्पर, डांबर पसरविणारी मशीन, डिझेल व पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी तब्बल 36 वाहने, मोठे जनरेटर व दोन कार्यालये जळाली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीचा पर्दाफाश करण्यासाठीच पोलिस पथके निघाली होती. त्याच पथकातील वाहन भूसुरुंगस्फोटाने उडवून नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या 15 जवानांसह वाहनाच्या चालकाचा बळी घेतला.
 
या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे, त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. लोकनिर्वाचित सरकारला धमकी देण्याचे प्रकरण राष्ट्रद्रोहाचेच म्हणायला हवे. एकीकडे सरकार गावगाड्यातील जनतेचे कष्ट कमी करण्याचे प्रयत्न करीत असताना, त्यांच्यासाठी दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असताना, नक्षलवाद्यांनी सरकारच्या विकास कामांविरुद्धच पुंगी वाजवावी, हे योग्य नव्हे. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर्स उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांनी फडकविले आहेत. भामरागड तालुक्यातील कसनासूर गावालगत वर्षभरापूर्वी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 40 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. त्यात नक्षलवादी संघटनेच्या चार दलम्‌ कमांडरचाही समावेश होता. ही घटना जशी राज्य सरकारच्या नक्षलविरोधी अभियानाला आलेले यश म्हणून गौरविली गेली, त्याउलट नक्षलवादी या घटनेमुळे खवळले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी ते सिद्ध झाले आणि त्यांनी तो महाराष्ट्रदिनी 15 पोलिसांचे रक्त सांडवून घेतला. कॉम्रेड रामको नरोटी हिचादेखील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या घटनेचासुद्धा नक्षल्यांनी बदला घेतला आहे. शहीद जवानांमध्ये गडचिरोलीमधील सहा, भंडारा जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तसेच हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे. या गावांमध्ये शोककळा पसरलेली आहे. पोलिस दल आणि राज्य शासन एकेका पोलिसाला नक्षलविरोधी अभियानासाठी सिद्ध करण्यासाठी प्रचंड खर्च करीत असते. पोलिसांची यंत्रणा त्यासाठी अहोरात्र झटत असते. एकेका जवानाच्या पोलिस दलातील सहभागाने त्याच्या कुटुंबाच्या आकांक्षा जागविल्या गेल्या असतात. नवयुवकांना रोजगाराची नवी संधी मिळालेली असते आणि त्यातून तो देशासाठी काहीतरी नवे करण्यासाठी आतुरलेला असतो. पण, कालच्या घटनेने देशासाठी काम करण्याची या 15 जवानांना मिळालेली संधी कायमची निमाली आहे. पण, त्यामुळे आमचे सैनिक, पोलिस आणि इतरही जवान घाबरून जाणार नाहीत, हे नक्षलवाद्यांनी ध्यानात घ्यावे. उलट, सरकार या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन नक्षलवाद्यांचा बीमोड केल्याशिवाय राहणार नाही. हल्ला होताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री करवून घेतली आहे. या भ्याड हल्ल्याची, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत त्यांच्या कुटुंबियांना ते तातडीने भेटले व त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. पुलवामासारखाच सर्जिकल स्ट्राईक नक्षलवाद्यांविरुद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांबाबत कुठलीच दयामाया न दाखवता आणि त्यांना नैतिक पाठबळ देणार्‍यांचाही मुलाहिजा न बाळगता, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जाहीर टीका करणार्‍या नक्षलवाद्यांना कायमचा धडा शिकविलाच गेला पाहिजे. देशातील लोकशाही नष्ट करण्यासाठी उचलले गेलेले हात कलम केलेच गेले पाहिजे! असे झाले तरच शहीद पोलिसांच्या आत्म्यांना शांती मिळणार आहे...