सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांची १८ व्या स्थानी झेप
   दिनांक :03-May-2019
वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी आहेत डॉ. धनंजय दातार
 
 
वाशीम:  ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना ‘अरेबियन बिझनेस’तर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत वर्ष 2018 साठी 18 वे मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. या यादीत समावेश असलेले डॉ. दातार हे एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत.
गेल्या वर्षी (वर्ष 2017) ते या यादीत 19 व्या क्रमांकावर होते आणि त्याआधी वर्ष 2016 मध्ये ते 39 व्या क्रमांकावर होते. केवळ दोन वर्षांत 39 व्या क्रमांकापासून 18 व्या क्रमांकापर्यंत वेगवान मुसंडी मारण्याची त्यांची ही कामगिरी थक्क करणारी ठरली आहे. ‘मसालाकिंग’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणार्‍या डॉ. दातार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये याबाबत माहिती देत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अरेबियन बिझनेस हे जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यम गृहांपैकी असून त्यांनी अरब विभागातील प्रगतीप्रती माझ्या आकांक्षेची व योगदानाची दखल घेऊन मला मानांकन दिले आहे. हा खरंच मोठा सन्मान आहे. या यादीत नावाची नोंद करण्यामागे अशा ताकदवान व प्रभावी भारतीय नेतृत्वांचा गौरव करण्याचा हेतू आहे, जे आपला दृष्टीकोन व गुंतवणूक यांच्या माध्यमातून अरब जगताला आकार देत आहेत. या कर्तृत्ववान भारतीय उद्योजकांनी आपली दूरदृष्टी, अस्सलता व चमकदार नेतृत्वाचा वापर करुन आपल्या भागधारकांसाठी, तसेच अर्थव्यवस्थांसाठी भांडवल निर्मिती करुन पश्‍चिम आशियात अत्यंत यशस्वी कंपन्या स्थापन केल्या आहेत. हे मानांकन म्हणजे अरब जगतात वास्तव्यास असलेल्या किंवा व्यवसाय चालवणार्‍या भारतीय व्यावसायिकांचे सखोल संशोधन व विश्‍लेषण यांचे फलित आहे.
 
 
 
 
 
डॉ. दातार पुढे म्हणाले, पुरस्कार व गौरव आपण करत असलेल्या कार्याची जबाबदारी वाढवतात. आम्हीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन आमच्या ग्राहकांना वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहू, ही ठाम श्रद्धा आहे. मला मिळालेला सन्मान हे आमच्या संपूर्ण संघटनेच्या समर्पित सांघिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आमच्या प्रयत्नांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणार्‍या संयुक्त अरब अमिरातीचीच्या शासकांचाही मी आभारी आहे. या यादीतील बहुसंख्य आघाडीचे उद्योजक व व्यवसाय मालक हे संयुक्त अरब अमिरातीतील आहेत. यावरुनच आम्हाला येथील नेतृत्वाकडून मिळत असलेल्या पाठबळाचा स्पष्ट प्रत्यय येतो.
 
दुबईमध्ये वडिलांनी सुरू केलेल्या एका लहानशा किराणा दुकानात व्यवसाय सुरु करुन त्यांनी झाडू-पोछा, लादी-सफाई व 50 किलोंची पोती पाठीवरुन वाहून नेण्यासारख्या कामांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात केली. हळूहळू वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते व्यवस्थापनाची कला शिकले. प्रामाणिकपणा, कष्ट व जिद्द या गुणांच्या जोरावर त्यांनी एका लहानशा दुकानातून जागतिक ख्यातीचा अल अदील हा समूह साकारला. आज त्यांच्या समूहाचा आखाती देशांतील 40 प्रशस्त सुपर स्टोअर्सची साखळी, 2 आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मसाला कारखाने, 2 पिठाच्या गिरण्या आणि एक आयात-निर्यात कंपनी असा विस्तार आहे. व्यवसाय क्षेत्रातील योगदानाबद्दल संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) शासकांनी डॉ. धनंजय दातार यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन ‘मसालाकिंग’ या बहुमानासह सत्कार केला आहे. डॉ. दातार यांचा समावेश फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकाच्या ‘टॉप 100 इंडियन बिझनेसमन इन अरब वर्ल्ड’ या प्रतिष्ठेच्या यादीत सन्मानपूर्वक करण्यात आला आहे. धनंजय दातार यांना आजवर अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ‘अल अदील ट्रेडिंग’ने 9000 भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा समूह तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन व इन्स्टंट्स अशा श्रेणींमध्ये स्वतःच्या ‘पिकॉक’ या ब्रँडखाली 700 हून अधिक उत्पादने बनवतो. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘अल अदील’ समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रात विस्तार साधला आहे.