दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास ते राज्य बिहारपेक्षाही वाईट असेल!
   दिनांक :03-May-2019
दिल्लीला जर पूर्ण राज्याचा दर्जा दिला तर ते राष्ट्रीय राजधानीसाठी एक मोठे संकट आणि अनर्थ ओढवून घेणारे ठरेल. एवढेच नव्हे तर दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था बिहार आणि उत्तरप्रदेशापेक्षाही अधिक भयावह असेल, असे विधान ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नवी दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार अजय माकन यांनी केले आहे.
माकन यांनी दिल्लीपुरते मत प्रदर्शित केले असते तर काही बिघडले नसते. पण, त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न त्याला जोडल्यामुळे कॉंग्रेसच्या या दोन्ही राज्यांतील निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

 
 
 
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना माकन यांनी म्हटले आहे की, दिल्ली ही देशाची राजधानी आहे. सारा पैसा हा केंद्र सरकारकडून येत असतो. जर पूर्ण राज्याचा दर्जा दिला तर राज्य चालविण्यासाठी जनतेवर मोठा कर बसवावा लागेल. त्यामुळे दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची अरिंवद केजरीवाल यांची मागणी मूर्खपणाची आहे, असे माकन यांनी म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांवरील खर्चच वर्षाला आठ हजार कोटींचा आहे. शिवाय येथे केंद्राने उभारलेल्या पाच ते सहा सुपर स्पेशालिटी इस्पितळांसाठी केंद्र सरकार दरवर्षी तीन हजार कोटी रुपये देत असते. शिवाय अनेक बाबी आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी एवढा मोठा निधी कुठून आणणार. स्थानिक प्रशासन यावर एक पैसा सुद्धा खर्च करीत नाही. जनतेवर मोठा कर लादण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. देशात जी मोठी शहरे आहेत, त्या शहरांतील पेट्रोलच्या दरांपेक्षा येथे कमी दर आहेत. कारण, केंद्र सरकार त्यावर सबसिडी देत असते. दिल्लीच्या जनतेने एवढा मोठा कर कशासाठी द्यायचा? केवळ केजरीवाल या एका व्यक्तीला जादा अधिकार मिळावेत म्हणून?
पूर्ण दर्जा दिला तर दिल्लीवर अनर्थ ओढवेल. तुम्हाला असे वाटते का की, गाझियाबाद, नोएडा, गुडगाव आणि बेगुसराय येथील कायदा-सुव्यवस्था दिल्लीपेक्षा चांगली आहे? असा प्रश्न माकन यांनी उपस्थित केला.
आमचे सरकार आले तर आम्ही आठवा वेतन आयोग आणू. शहरातील प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी उपाय योजू. कंत्राटी कामगारांना स्थायी करू. सिलींग हटवू. आम्ही दिल्लीतील सातही जागा िंजकणार असून केंद्रातही सरकार स्थापन करू. गरिबांसाठी न्याय योजना आम्ही आणली आहे. त्याचा लाभ जनतेला होईल.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बिगरकॉंग्रेस आणि बिगरभाजपा सरकारचा नारा दिला आहे. त्याकडे लक्ष वेधले असता माकन म्हणाले, जे लोक अशा फ्रंटच्या गोष्टी करीत आहेत, ते भाजपाला मदत करण्यासाठीच आहेत. देशात दोनच फ्रंट आहेत. एक रालोआ आणि दुसरा संपुआ. 2004 सारखेच यश आम्हाला यावेळीही मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पप पप