हिंगणघाट येथे कपड्याच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान
   दिनांक :03-May-2019
हिंगणघाट: येथील विठोबा चौकाजवळ असलेल्या शंकर रेडिमेड स्टोअर या दुकानाला आज सकाळी आग लागल्याने जवळपास 9 लाखाचा माल जळून राख झाला. मिळालेल्या माहितीनुसार , या दुकानाचे मालक जेठानंद सिरूमल खिलवानी दि २ ला गुरुवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान दुकानाला आग लागल्याची त्यांना माहिती मिळाली. मुख्य बाजारपेठेत असलेल्या या दुकानातून निघत असलेला धूर दिसताच नागरिकांनी स्थानिक अग्निशमन दलाला सूचना दिली अवघ्या कांही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून लवकरच आग आटोक्यात आणली. त्यामुळे लगतची अनेक दुकाने बचावली व मोठी दुर्घटना टळली. रेडिमेड गारमेंट व टेलरिंग साहित्य जळाल्याने जवळपास ९ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा तर्क लावला जात आहे.