चीनमध्येही झळकणार ‘हाफ तिकीट’ चित्रपट
   दिनांक :03-May-2019
गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहेत. अशाच एका नवीन संकल्पनेतुन तयार झालेला हाफ टिकीट हा चित्रपट नुकताच प्रदर्शीत झाला. समित कक्कड दिग्दर्शित या चित्रपटाने उत्कृष्ट पटकथा व उत्तम अभिनयाच्या जोरावर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. आता आणखी एक मानाचा तुरा हाफ तिकीटच्या शिरपेचात रोवला जात आहे. हा चित्रपट लवकरच चीनमध्येही प्रदर्शीत केला जाणार आहे. आजवर फक्त बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित केले जात होते. परंतु हाफ टिकीटच्या माध्यमातून आता मराठी चित्रपटही चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज आहेत असे म्हटले जात आहे.
 
 
हाफ तिकीट पुढल्या एक-दोन महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज असून या चित्रपटाच्या निमित्ताने चीनसारखी मोठी बाजारपेठ आता मराठी चित्रपटांसाठीसुद्धा खुली झाली आहे असे मत चित्रपटाचे निर्माते नानूभाई जयसिंघानी यांनी व्यक्त केले. तसेच दिग्दर्शक समित कक्कड यांनी मराठी चित्रपट आज जगभरात पोहोचत असल्याचा आनंद व्यक्त केला.
हाफ तिकीट हा कुठल्याही अर्थाने फक्त लहान मुलांचा चित्रपट उरत नाही. गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ‘काक्का मुताई’ या चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘हाफ तिकीट’ इथल्या मातीचं वास्तव घेऊन दिग्दर्शक समित कक्कड यांनी अस्सल रंगवला आहे. एरव्ही चित्रपटांमधून झोपडपट्टीतलं जीवन चित्रित करताना तिथली गरिबी हाच केंद्रबिंदू ठेवून परिघातली कथा आपल्यासमोर येते. या चित्रपटात नाल्याच्या कडेने वसलेली झोपडपट्टी, तिथली माणसं दाखवताना कॅ मेरा त्यापलीकडे बरंच काही टिपतो. घाणीच्या साथीने राहत असलेली, छोटय़ाशा ताडपत्रीवजा घरात राहतानाही स्वच्छतेने राहणारी, मानाने जगणारी, रोजचा दिवस आपल्यापरीने हसतखेळत घालवणारी, एकमेकांना सुखदु:खात सांभाळून घेणारी माणसंही दिसतात.