मला देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही- अक्षय कुमार

    दिनांक :03-May-2019
 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार याच्या नागरिकत्वावरून देशात वादंग माजला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर मुलाखत घेतल्यापासून मोदी विरोधकही त्याला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशातच विरोधकांच्या हाती अक्षयच्या नागरिकत्वाचा मुद्दा आल्यामुळे त्या मुद्यांवरून उगाच वाद उभा करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर आपल्या टीकाकारांची तोंडे बंद करताना अक्षय म्हणाला की, मला देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही.
 
 
 
 
आपल्या टीकाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला की, मी कधीच नागरिकत्वाचा मुद्दा लपवलेला नाही किंवा हा मुद्दा कधी नाकारलेलाही नाही. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. मात्र, हेही तेवढेच खरे आहे की मी गेल्या सात वर्षांत एकदाही कॅनडाचा दौरा केलेला नाही. मी भारतात काम करतो आणि येथेच सारे करही चुकवितो.
गेल्या अनेक वर्षांपासून मी येथे राहात आहे. मात्र, आजपर्यंत मला कधी आणि कोणासमोर आपले देशप्रेम सिद्ध करावे लागले नाही. तशी गरजही पडली नाही, पडणारही नाही. मात्र, जो मुद्दा वैयक्तिक, कायदेशीर आणि गैरराजकीय आहे अशा माझ्या नागरिकत्वावरून उगाच वाद उभा केला जात आहे, तो अनावश्यक आहे. शेवटी मी एवढेच सांगतो की, देशाला मजबूत करण्यासाठी मी माझे अल्पसे योगदान देतच राहणार आहे, असेही त्याने येथे नमूद केले आहे. लोकसभेच्या रणधुमाळीत अनेक बॉलीवूडकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, या सगळ्यापासून अभिनेता अक्षय कुमार मात्र लांबच होता. देशाच्या राजकारणाविषयी भूमिका घेत ट्विट करणार्‍या अक्षयने निवडणुकीत मतदान का केले नाही, असा प्रश्न त्याला अलिकडेच एका पत्रकाराने विचारला. कुमारने हा प्रश्न फारसा गंभीरपणे घेताना नव्हता. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अक्षय कुमार ब्लँक चित्रपटाच्या स्क्रीिंनगला गेला असताना त्याला पत्रकारांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले होते. त्यात, एका पत्रकाराने मतदानाचा विषय काढला. देशातील जनता तुझ्यावर प्रचंड प्रेम करते. परंतु, तुला ट्रोलही केले गेले. तू मतदान करताना दिसला नाहीस...’ पत्रकाराचा प्रश्न संपण्याच्या आतच अक्षयने ‘चलिए, बेटा... चलिए’ म्हणत पत्रकाराला गप्प केले आणि तिथून काढता पाय घेतला.
अक्षयचा जन्म जरी पंजाबमधील अमृतसर येथे झाला असला तरीही अधिकृतरीत्या तो भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असून कॅनडाने त्याला तिकडचे नागरिकत्व दिले आहे. भारतीय नियमाप्रमाणे दोन देशांचे नागरिकत्व ठेवण्यास कोणत्याही नागरिकाला मान्यता नाही. त्यामुळे अक्षयने भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून कॅनडाचे नागरिकत्व अबाधित ठेवले. त्यामुळे अक्षय कुमारला भारतात मतदान करण्याचा अधिकार मिळाला नाही. घ(वृत्तसंस्था)