भारत कसोटी यादीत अव्वल

    दिनांक :03-May-2019
दुबई,
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक सांघिक क्रमवारीत भारत आणि इंग्लंड या संघांनी अनुक्रमे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील अव्वल स्थान टिकवले आहे.
 

 
२०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षांतील कामगिरीला या क्रमवारीसाठी ५० टक्के ग्राह्य धरण्यात आले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला एक महिन्याचा अवधी बाकी असताना प्राप्त झालेले एकदिवसीय क्रिकेटचे अग्रस्थान हे इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावणारे आहे. भारतीय संघ दोन गुणांच्या फरकाने द्वितीय स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडने भारतापासूनचे गुणांचे अंतर आठवरून दोनपर्यंत कमी केले आहे. याचप्रमाणे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकून १०५ गुणांसह चौथे स्थान मिळवले आहे. इंग्लंडच्या खात्यावर ९८ गुण जमा आहेत. सातव्या स्थानावरील पाकिस्तान आणि आठव्या स्थानावरील वेस्ट इंडिज यांच्यात आधी ११ गुणांचे अंतर होते, ते आता विंडीजने दोनपर्यंत कमी केले आहे.
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे. याचप्रमाणे वेस्ट इंडिजने श्रीलंकेवर कुरघोडी करताना सातवे स्थान प्राप्त केले आहे. विश्वचषकामधील १० संघांनीच एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल १० क्रमांकामधील आपले स्थान अबाधित राखले आहे.