मुशर्रफ यांच्याविरोधातील देशद्रोहाच्या खटल्याला स्थगिती
   दिनांक :03-May-2019
इस्लामाबाद,
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधातील देशद्रोहाच्या खटल्याला पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने १२ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. प्रकृती खालावल्यामुळे आणि आगामी रमझान महिन्यामुळे या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मुशर्रफ यांनी न्यायालयासमोर केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून खटल्याची सुनावणी १२ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.
 
 
मुशर्रफ यांच्यावतीने त्यांचे वकील ऍड. सलमान सफदार यांनी न्यायालयात याबाबतचा अर्ज सादर केला होता. मुशर्रफ हे न्यायालयामध्ये उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानात परत यायला इच्छुक आणि आतूर आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थ्यता आणि वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांना विशेष न्यायालयासमोर उपस्थित राहता येत नाही. त्याबद्दल मुशर्रफ यांनी या अर्जामध्ये न्यायालयाची माफी मागितली आहे आणि सुनावणी रमझान महिना संपेपर्यंत, 4 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती केली.
मुशर्रफ हे सहायकाविना न्यायालयात बोलूही शकत नाहीत. त्यामुळे मुशर्रफ यांची ही विनंती मान्य करून त्यांना संधी देण्यात यावी, अशी विनंती सफदार यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्याची सुनावणी 12 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.