आर. के. स्टुडिओच्या जागी बांधले जाणार आलिशान फ्लॅट्स!
   दिनांक :03-May-2019
 बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओ अखेर ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने विकत घेतला आहे. शुक्रवारी या कंपनीने आर. के. स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. स्टुडिओच्या जागी आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत.

 
या स्टुडिओच्या विक्रीची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून कपूर कुटुंबीय गोदरेज प्रॉपर्टीजशी चर्चा करत होते. ‘२.२ एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत,’ अशी माहिती ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ कंपनीने दिली.
रणधीर कपूर यांनीसु्द्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘माझ्या कुटुंबासाठी चेंबूरमधील ही जागा फार महत्त्वपूर्ण आहे. या जागेवर आता नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे,’ असं त्यांनी सांगितलं. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न हे फारच होते आणि देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता.