कॉंग्रेससोबत आघाडीसाठी राष्ट्रवादीची उद्या बैठक

    दिनांक :03-May-2019
शरद पवार घेणार आढावा
मुंबई: लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत केलेल्या महाआघाडीला राज्यात कितपत यश मिळेल, याचा अंदाज घेतानाच सहा महिन्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी करताना कोणती भूमिका घ्यायची, हे ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या शनिवारी यशवंतराव चव्हाण केंद्रात आढावा बैठक बोलावली आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढली असली तरी, या निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार राष्ट्रवादीच्या तुलनेत थंडाच होता. या लोकसभा निवडणुकीत आघाडीला किती जागा मिळतील, तसेच विधानसभा निवडणुका कॉंग्रेससोबत लढताना कशा वाटाघाटी करता येतील, याचा अंदाज बांधण्यासाठी पवार या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर याच बैठकीत राज्यातल्या दुष्काळाचाही आढावा घेतला जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीने यावेळी 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले, तर दोन ठिकाणी मित्रपक्षांना पािंठबा दिला. खा. सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून निवडणूक लढवली. बारामती हा पवार यांचा पारंपरिक गड मानला जात असला तरी यावेळी या ठिकाणच्या निकालांविषयी निरनिराळे तर्क लढवले जात आहेत. त्याचप्रमाणे पार्थ पवार यांनाही मावळ येथून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. या जागांसह राष्ट्रवादीकडून लढवण्यात आलेल्या अन्य जागांबाबत नेमके काय चित्र असेल, याबाबत शरद पवार स्थानिक नेत्यांकडून माहिती घेणार आहेत. या बैठकीला पक्षाचे सर्व उमेदवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह सर्व विभागातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे सर्व जिल्हाप्रमुखही या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीनंतर शरद पवार पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
 

 
 
 
विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
राष्ट्रवादीला या निवडणुकीत 10 ते 12 जागा मिळतील, असा अंदाज बांधला जात आहे. लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकाही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असल्याने, या निवडणुकांसाठीही मोर्चेबांधणी करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे ठरवता येतील, यावर बैठकीत चर्चा केली जाईल. राज्यात पडलेला दुष्काळ तसेच शेतकर्‍यांशी संबंधित मुद्यांकडे पक्षाच्या नेत्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी दिल्या जाऊ शकतात, असे जाणकाराने सांगितले.
 
अधिवेशनाची रणनीती
जून महिन्यात राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्याची रणनीतीही आताच आखली जाऊ शकते. लोकसभेचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. त्यानंतर राज्यातील व देशातील स्थितीनुसार पक्षाची भूमिका काय असावी याबाबत रणनीती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॉंग्रेसही घेणार आढावा
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा, अब्दुल सत्तार यांच्यावरील बडतर्फीची कारवाई, नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड या अनुषंगाने कॉंग्रेसचेही राज्यातील नेते येत्या 10 मेपर्यंत आढावा बैठक घेणार असल्याचे कळते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून ही बैठक घेतली जाणार आहे.