हिजबुलच्या टायगरसह तीन अतिरेक्यांचा खातमा
   दिनांक :03-May-2019
श्रीनगर,
सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शुक्रवारी सकाळी शोपियॉं जिल्ह्यात झडलेल्या एका भीषण चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या तीन अतिरेक्यांचा खातमा केला. यात लतिफ टायगर अशी ओळख असलेल्या हिजबुलच्या वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे. चकमकीत एक जवान जखमी झाला.
 

 
 
लतिफ टायगर हा हिजबुलच्या आघाडीच्या फळीतील दहा कमांडरपैकी एकमेव जिवंत अतिरेकी होता. आज त्याचाही खातमा झाल्याने हिजबुलची आघाडीची फळी पूर्णपणे नष्ट करण्यात जवानांना यश मिळाले आहे. जुलै 2016 मध्ये हिजबुलचा कमांडर बुरहान वानीला ठार मारण्यात आले होते. त्यावेळी बुरहानच्या 10 वरिष्ठ कमांडरची यादी गुप्तचर यंत्रणांनी तयार केली होती. यातील 9 कमांडरचा आतापर्यंत खातमा करण्यात आला आहे. लतिफ टायगर मात्र वाचला होता. आज त्यालाही यमसदनी धाडून, जवानांनी हिजबुलचे कंबरडे मोडले आहे.
 
शोपियॉंतील इमाम साहिद परिसरात अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली. एका पडक्या घरात हे अतिरेकी लपले होते. जवानांना पाहताच त्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली.
 
ठार झालेल्या अतिरेक्यांजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. हे तिन्ही अतिरेकी शोपियॉं जिल्ह्याचेच रहिवासी असून, त्यांचे मृतदेह त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात येत आहेत, असे प्रवक्ता म्हणाला.
दरम्यान, चकमक सुरू असताना, स्थानिक नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली. जवानांनीही त्यांना पांगविण्यासाठी बळाचा वापर करतानाच, अश्रुधूराचा माराही केला. यात काही नागरिक जखमी झाले.