पहिला विश्वचषक आहे इंग्लंडच्या नावे

    दिनांक :30-May-2019
भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे. भारतात कुठेही गेलात तर गल्लो-गल्ली पोरं विटा दगडांनी उभा केलेला स्टम्प लावून क्रिकेट खेळताना हमखास दिसतात. त्यातच क्रिकेट विश्वचषक आला की क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला पारावारं उरत नाही. १९७५ साली पहिली विश्वचषक स्पर्धा खेळली गेली होती. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला गुरूवारपासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून गेल्या ४४ वर्षांत एकूण ११ विश्वचषक खेळले गेले असून यंदाचा हा १२ वा विश्वचषक इंग्लंड व वेल्स येथे आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंडला पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. क्रिकेट हा खेळ प्रामुख्याने पुरुषांचा समजला जातो. मात्र पुरुष विश्वचषकाच्या दोन वर्ष आधी १९७३ साली पहिली महिला विश्वचषक स्पर्धा आयोजित केली गेली होती. हा विश्वचषक जगातील पहिला विश्वचषक म्हणून ओळखल्या जातो.
 
 
 
४६ वर्षांपूर्वी झालेल्या महिलांच्या विश्वचषकावर यजमान इंग्लंडने आपले नाव कोरले होते. या विश्वचषक स्पर्धेत एकूण सात देशांनी सहभाग नोंदविला होता. यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, जमैका, त्रिनिदाद ऍण्ड टोबॅगो, यंग इंग्लंड वुमन आणि इंटरनॅशनल इलेव्हन वुमन या संघांचा समावेश होता. ही स्पर्धा 'राऊंड रॉबीन' या पद्धतीने खेळवली गेली होती. या स्पर्धेत प्रत्येक संघाने इतर सहा संघांबरोबर प्रत्येकी एक सामना खेळला होता.
  
 
 
या स्पर्धेत इंग्लंडने स्वतःचा जलवा दाखवत साखळी फेरीतील ६ पैकी ५ सामने जिंकले होते. मात्र इंग्लंडला कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाची चव लागली होती. इंग्लंडच्या इनिड बेकवेल हिच्या बॅटमधून सहा सामन्यांमध्ये सर्वाधिक २६४ धावा निघाल्या होत्या. तसेच यंग इंग्लंडच्या रोसलिंड हेग्स हिने सहा सामन्यात सर्वाधिक म्हणजेच १२ विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये रंगला होता. यात इंग्लंडने पहिली फलंदाजी करताना ६० षटकांमध्ये तीन विकेट्सच्या मोबदल्यात २८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाला केवळ १८७ धावाचं करता आल्या. इंग्लंडने हा सामना ३० धावांनी जिंकत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विश्वचषकात टीम इंडिया सहभागी नव्हती. परंतु त्यानंतर १९७८ मध्ये झालेल्या दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ सहभागी झाला होता. महिला क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.