अमरावती विभागाला 4.36 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

    दिनांक :30-May-2019
‘मिशनमोड’वर काम करण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश 

 
 
अमरावती,
शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात अमरावती विभागाचे 4 कोटी 36 लाख 53 हजार नऊशे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, सर्व विभागांनी समन्वय ठेवून मिशनमोडवर कामे करून हे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश राज्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येथे दिले. या चळवळीतून वृक्षप्रेमाचे बीजारोपण प्रत्येकाच्या मनात व्हावे व वृक्षसंगोपन ही सवय व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
आगामी पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन, पूर्वतयारीबाबत विभागस्तरीय आढाव्याची राज्यातील पहिली बैठक येथील नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे, अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.
 
मुनगंटीवार म्हणाले की, तापमानवाढ, पाणीटंचाई अशा संकटांवर मात करण्यासाठी जंगलांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षलागवडीचा हा उपक्रम शासकीय न राहता जनतेचा झाला पाहिजे. वृक्षलागवड करताना जैवविविधतेचे संवर्धन होईल, अशी झाडे लावावीत. मधुमक्षिका संवर्धनासाठी फुले येणारे वृक्षही लावावेत जेणेकरून आसपासच्या शेतीलाही लाभ होऊन कृषी उत्पादकता वाढेल. रस्त्यांचा भविष्यातील विकास लक्षात घेऊन काही अंतर राखून त्याच्या दुतर्फा महावृक्ष लावावेत. जिल्ह्याचा स्वतंत्र ट्री प्लॅन तयार करावा, असे त्यांनी सुचविले.
 
अटल आनंदवनाची निर्मिती करणार
जैवविविधता राखणा-या आणि कमी क्षेत्रात अनेक प्रकारची घनदाट झाडी असणार्‍या ‘मियावाकी’ या जपानी संकल्पनेवर आधारित ‘अटल आनंदवन’ ही योजना राज्यभर राबविण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, कमी क्षेत्रफळात अधिकाधिक घनदाट वैविध्यपूर्ण झाडांची वने या योजनेतून साकारणार आहेत. वरोरा येथील आनंदवनात याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्यभर विशेषत: शहरांमध्ये वनांच्या निर्मितीसाठी हा उपक्रम लाभदायी ठरणार आहे.
 
असे आहे विभागाचे नियोजन
अमरावती जिल्ह्यात 1 कोटी 11 लाख 68 हजार 900, अकोला जिल्ह्यात 62 लाख 29 हजार 500, बुलडाणा जिल्ह्यात 82 लाख 40 हजार 150, वाशीममध्ये 43 लाख 3 हजार 500 व यवतमाळमध्ये 1 कोटी 37 लाख 11 हजार 850 इतके वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार विभागात 4 कोटी 41 लाख 9 हजार रोपे उपलब्ध आहेत. विभागात सद्य:स्थितीत 3 कोटी 20 लाख 52 हजार 116 खड्डे पूर्ण झाले आहेत व उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. ही कामे मिशनमोडवर पूर्ण करण्याचे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.