प्रतापचंद्र सरंगी यांना मंत्री करून मोदींनी गरिबाला दिला खरा न्याय!

    दिनांक :30-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली, 
राष्ट्रपती भवनात मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा शानदार सोहळा सुरू होता. सर्वप्रथम पंतप्रधान, कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि शेवटी राज्यमंत्र्यांची नावे पुकारली जात होती...राज्यमंत्र्यांच्या यादीत 22 वे नाव पुकारले गेले. प्रतापचंद्र सरंगी! नाव ऐकताच सारा आसमंत टाळ्यांच्या कडकटाटाने दुमदुमून गेला. कितीतरी वेळ हा कडकडाट सुरू होता... 
 
 
प्रतापचंद्र सरंगी. ओडिशातील एका तुटक्या झोपडीत राहणारा सामान्य माणूस. गोरगरिबांच्या सेवेसाठी रांत्रदिवस धावून जाणारा. भाजपाने यावेळी त्यांना बालासोरमधून तिकीट दिले. समोर होता हजार कोटींची संपत्ती असलेला बिजदचा उमेदवार आणि विद्यमान खासदार रवींद्र जेना. निवडून येण्यासाठी वाट्टेल तसा पैसा खर्च केला या जेनांनी. सरंगी हे त्याच्यासमोर काहीच नव्हते. प्रचाराला एक सायकल आणि सोबत गावकरी. सारा प्रचार त्यांनी सायकलवर केला. निकाल लागले आणि काय आश्चर्य? प्रतापचंद्र सरंगी हे 12596 मतांनी विजयी झाले. सर्वांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
 
 
प्रामाणिक माणूस निवडणुकीत निवडून येऊ शकत नाही, या नेहमीच्या कथनाला तिलांजली मिळाली होती. ओडिशात त्यांना ओडिशाका मोदी असे लोक प्रेमाने म्हणत होते. त्यावर मोदींनीही प्रत्यक्षात कळस चढविला. त्यांनी सरंगी यांना थेट राज्यमंत्री करून सामान्य माणसाचा खर्‍या अर्थाने सन्मान केला. यापूर्वीही ते ओडिशा विधानसभेत दोनदा, 2004 व 2009 साली निवडून आले होते. त्यावेळीही सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
 
आता तर ते लोकसभेवर निवडून गेले आणि मोदींनी त्यांना राज्यमंत्री केले. सरंगी यांचा खर्‍या अर्थाने सन्मान झाला. सबका साथ, सबका विकास हा नारा मोदींनी प्रत्यक्षात साकार करून दाखविला. सरंगी यांचे नाव जेव्हा पुकारले गेले, तेव्हा झालेला टाळ्यांचा कडकडाट हे त्याचे प्रतीक होते. त्यामुळे एक वेगळी सुखदायी किनार या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याला लाभली.