तरुणाई आणि मोदी सरकार!

    दिनांक :30-May-2019
सर्वेश फडणवीस 
 
सतराव्या लोकसभेचा निकाल लागला आणि देशात पुन्हा स्थिर सरकार जनतेने प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. नरेंद्र मोदी या पंचाक्षरी विकासाच्या मंत्राला जनतेने जो पाठिंबा दिला, तो अद्भुत आणि ऐतिहासिक असाच आहे. त्याबद्दल येणार्‍या सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!
 
यंदाच्या निवडणुकीसाठी नवमतदारांची, विशेषत: तरुण मतदारांची संख्या लक्षणीय होती. यंदाच्या निवडणुकीत 89 कोटी 61 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र होते. जवळपास सात कोटी नवमतदारांपैकी किमान पाच कोटी मतदार मतदान करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली गेली होती. यापैकी बहुतांश मतदारांनी गेल्या पाच वर्षांत शाळा-महाविद्यालयांमध्ये काय होत आहे, काय झाले आहे, समाजमाध्यमांवर काय सुरू आहे, हे निश्चितपणे जाणून घेतलेच होते. आपल्या आसपास काय घडते आहे, हे जाणून घेण्यासाठी पिढीला आता केवळ शाळा-कॉलेज, शिक्षक-प्राध्यापक आणि पुस्तकांवर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही. आजची पिढी ही अतिशय हुशार आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेले बदल अतिशय जलद गतीने आत्मसात करण्यास शिकली आहे. 

 
 
जगात जे बदल होत आहेत, ते का आणि कसे होत आहेत, कुणामुळे होत आहेत, याचे आकलन करण्याची या पिढीची क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे मतदान करताना ही पिढी नेमक्या मुद्यांचा विचार करेल, यात शंकाच नव्हती. आज सोशल मीडियावर सक्रिय राहून जगाचा अभ्यास, राजकीय रंग यांसारख्या अनेक विषयांवर अभिव्यक्त होत आणि संपूर्ण माहिती घेत आपली वैचारिक भूमिका मांडण्यात तरुण यशस्वी झाला आहे. देशात ज्या विविध समस्या आहेत, त्या केवळ रोजगाराच्याच नाहीत, तर सामाजिकही आहेत आणि सांस्कृतिकही आहेत. त्यामुळे या समस्या विचारात घेत, त्यांच्या मुळाशी जात नेमके कारण शोधून तरुणाईने मतदानाचा हक्क बजावला.
  
देशात सध्या शैक्षणिक संस्थांचे अक्षरश: बाजारीकरण झाले. मोठ्या संख्येत तरुणाईने उच्च शिक्षण घेतले आणि ही उच्च शिक्षित पिढी रोजगार मिळविण्यासाठी स्पर्धेच्या मैदानात उतरली. पण, रोजगाराचे क्षेत्र आणि संधी बदलल्या आहेत, स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे तरुणाईपुढे मोठी आव्हाने आहेत. मधल्या काळात पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्रासोबतच तरुणाईला कौशल्यही शिकविले पाहिजे, यासाठी प्रयत्नच झाले नाहीत आणि मोदी सरकारने कौशल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून तरुणाईला दिशा दाखवण्यात यश मिळवले आहे.
 
आज स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून तरुण अनेक रोजगार उपलब्ध करण्यासाठी तयार झाले आहेत. तरुण अधिक जागरूक झालेला यावेळी बघायला मिळतो आहे. 88 टक्के भारतीय तरुण समाजात बदल घडवून आणायचे असतील, तर ते मीच घडवू शकतो, या गोष्टीवर त्याचा ठाम विश्वास आहे. मीच माझं भविष्य आणि समाज बदलू शकतो, हा विश्वास त्याच्यात आलेला आहे आणि हा विश्वास निर्माण करण्यासाठी सरकारने अनेक योजना या तरुणांसाठी केलेल्या आपण बघूच शकतो.
 
अतिशय कठीण परिस्थितीत जो नेता गुजरातसारख्या राज्यात परिवर्तन घडवू शकतो, तो नेता देशातही परिवर्तन घडवून आणू शकला आणि हे परिवर्तन सकारात्मक होते, हा विश्वास तरुणाईच्या मनात निर्माण होण्यास फार वेळ लागला नाही. तरुणाईला आजही मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणूनच तरुणाईने मोदींना आणखी एक संधी दिलेली आहे.
 
पाकिस्तानकडून सातत्याने भारताला त्रास दिला जात होता. पुलवामाच्या हल्ल्यानंतर मोदी सरकारने राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन घडवत, भारतीय वायुदलाला सर्जिकल स्ट्राईकसाठी परवानगी दिली आणि देशवासीयांच्या मनात जे होते, ते घडवून आणले. त्यानंतर बालाकोटवर एअर स्ट्राईक करून बदला घेण्याचा मानस कसा असू शकतो आणि अशी राजकीय इच्छाशक्ती दाखवत देशाच्या ताकदीचा जगाला परिचय घडविणार्‍या नेत्याला पुन्हा संधी देत स्थिर सरकार निवडून दिले. मतदार जागरूक होत बदलासाठी कसा सिद्ध असू शकतो, याचा परिचय तरुणाईने या निवडणुकीत दिला. आज भारत युवा देश म्हणून जगासमोर आहे. उद्याचे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता या युवा देशाकडेच येणार आहे, हा विश्वास तरुणाईला झाला आहे आणि यासाठी तो अधिक जागरूक आणि संयत झालेला बघायला मिळतो आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ यासाठी तरुणाईने मोदी सरकारवर पुनश्च विश्वास दर्शवत ऐतिहासिक विजय मिळवून दिलेला आहे...