अफवांमुळे मी इंडस्ट्रीत बदनाम- विद्याधर जोशी

    दिनांक :30-May-2019
‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक मजेशीररित्या एकमेकांशी जुळवून घेत आहेत. या स्पर्धकांमध्ये फावल्या वेळेत गप्पा रंगत आहेत आणि त्यांच्या गप्पांमधून इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. अशाच गप्प्यांदरम्यान विद्याधर जोशी ऊर्फ बाप्पा यांनी इंडस्ट्रीमध्ये ते का बदनाम आहेत हे सांगितलं. ‘अनसीन अनदेखा’मधील व्हिडिओत या गप्पा पाहायला मिळाल्या.

 
बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच बाप्पा यांनी अनेक चित्रपट आणि मालिका साइन केले असतील असं म्हणत शिवानी सुर्वे आणि दिगंबर नाईक यांनी मस्करी करण्यास सुरुवात केली. ‘माझ्याकडे चार तासच आहेत लवकर काय ते करून घ्या असं म्हणत बाप्पा सेटवर येतो. हा किस्सा अनेकजण सांगतात,’ असं शिवानी म्हणाली. यावर विद्याधर जोशींनी उत्तर दिलं. ‘माझ्याबद्दल अशा चर्चा होतात असा अनुभव मलाही आला आहे. आता नाव घेता येणार नाही पण आपल्याच इंडस्ट्रीतील एक निर्माती मला प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी म्हणाली बाप्पा, तू पुरेसा वेळ देत नाहीस असं मी ऐकलंय. माझ्या एका मालिकेच्या निर्मात्यानेही मालिका सुरू होण्यापूर्वी मला हाच प्रश्न विचारला. मी असं काहीच करत नाही. मी ठरलेला वेळ देतो आणि माझं काम प्रामाणिकपणे करतो. उलट, या अशा अफवांमुळे मी उगाच इंडस्ट्रीत बदनाम झालोय,’ असं ते म्हणाले.