डॉ. पायल आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

    दिनांक :30-May-2019
 मुंबई: नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी तिन्ही महिला आरोपींना अटक केली आहे.
 

 
 
डॉ. पायल तडवी यांनी मागील 22 मेच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तपासात डॉ. पायल यांच्या शरीरावर जखमा असल्याने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा युक्तिवाद वकील नितीन सातपुते यांनी केला होता. तसेच, आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ॲड. सातपुते यांनी केली होती. त्यानंतर तडवी कुटुंबीयांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा आदेश दिला.
दरम्यान, पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने रॅिंगगविरोधी कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. आजवर केवळ विद्यापीठ अनुदान आयोग आणि समतूल्य संस्थांच्या निर्देशांवर चालविले जाणारे रॅिंगग विरोधाचे कार्य आणखी गतिमान करण्यासाठी विद्यमान कायद्यातील कच्चे दुवे शोधून आता सरकार त्या ठिकाणी दुरुस्ती करणार आहे. त्यादृष्टीने बैठकांनाही सुरुवात झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.