गंगाजल थेट पिण्यायोग्य नाही

    दिनांक :30-May-2019
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मत
नवी दिल्ली,
गंगा नदीच्या शुद्धीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असले, तरी नदीचे पाणी थेट पिण्यायोग्य सध्यातरी नक्कीच नाही आणि या पाण्याने आंघोळही केली जाऊ नये, असे मत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केले आहे.
 

 
 
गंगा नदीच्या फक्त सात घाटांवरून वाहणारे पाणी निर्जंतुकीकरण करण्यात आल्यानंतर पिण्यायोग्य होऊ शकते. उत्तरप्रदेश आणि बंगालमधील गंगेचे बहुतांश पाणी आरोग्यास अजूनही अपायकारक आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.
 
मंडळाने गंगेच्या पाण्यासंदर्भात एक नकाशाही जारी केला आहे. यात नदीतील पाण्यात कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण फार जास्त असल्याचे दाखविण्यात आले आहे. या दोन्ही राज्यांमधून वाहणार्‍या गंगा नदीच्या सुमारे 86 ठिकाणी निगराणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यातील केवळ सातच ठिकाण असे आहेत, जेथील पाणी निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेनंतर प्यायले जाऊ शकते. उर्वरित 78 ठिकाणचे पाणी आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात घातक आहे, असे मंडळाने म्हटले आहे.
 
गंगेच्या पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी ही निगराणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. याच केंद्रांमधून माहिती गोळा करण्यात आली आहे. भारतात लाखो, करोडो लोक गंगा नदीत पवित्र स्नान करीत असतात. या अभ्यासात असेही आढळून आले की, हे पाणी फार जास्त प्रदूषित असल्याने, ते आंघोळीसाठीही योग्य नाही. आंघोळीच्या दृष्टीने देशभरातून वाहणार्‍या गंगा नदीतील फक्त 18 ठिकाणेच अशी आहेत, जिथे आंघोळ केली जाऊ शकते, तर 62 ठिकाणे आंघोळीसाठी अपायकारक असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
78 पैकी ज्या ठिकाणचे पाणी पिण्यास आणि आंघोळीसाठी पूर्णपणे अयोग्य आहेत, त्यात बिहार व कानपुरातील गोमती नदी, वाराणसीतील गोल घाट, रायबरेलीतील दलमऊ, अलाहाबाद, गाझिपूर, बक्सर, पाटणा, भागलपूर, तसेच बंगालमधील हावडा-शिवपूर येथील संगमांचा समावेश आहे. ज्या सहा ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे दिसून आले, त्यात गंगोत्रीतील भागीरथी, रुद्रप्रयाग, देवप्रयाग, उत्तराखंडमधील रायवाला, ऋषिकेश, बिजनौर आणि बंगालमधील डायमंड हार्बरचा समावेश आहे.
...