पहिल्यांदा मेट्रो बघून हिंगणावासी भारावले

    दिनांक :30-May-2019
 धावत्या मेट्रोविषयी नागरिकांचा उत्साह
 लोकमान्य नगर ते सुभाष नगर दरम्यान आनंदयात्रा
नागपूर: माझी मेट्रोत बसून खर्‍या अथार्र्ने शहराचे सौंदर्य डोळ्यात साठविण्याची इच्छा बाळगणार्‍या नागरिकांना शहरात मेट्रो कशाप्रकारे धावणार याचे दर्शन काही महिन्यापूर्वीच झाले. परंतु, गुरुवार 30 मे रोजी पहिल्यांदाच लोकमान्य नगर ते सुभाष नगर यादरम्यान धावणार्‍या मेट्रोला बघून हिंगणावासी भारावून गेले. याचि देही याचि डोळा प्रत्यक्ष पाहिल्याने त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. कसलीही पूर्वसूचना नसताना अचानक हिंगणा मार्गावर प्रथमच मेट्रो धावताना बघून स्थानिक रहिवासी चकित झाले. महामेट्रोच्या वतीने लोकमान्य नगर मेट्रोस्थानक ते सुभाष नगर मेट्रोस्थानक आनंदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्यांदाच रुळावर धावणारी मेट्रो गाडी बघून नागरिक भारावून गेले. हा ऐतिहासिक क्षण आपापल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांची जणू स्पर्धाच लागली होती. मेट्रो गाडीचे रुळावर दर्शन होताच लगेच सोशल मीडियावर गाडीची छायाचित्रे आणि व्हीडियो व्हायरल झाले. रस्त्यावरून जाणारे प्रवासी देखील वाहन थांबवून गाडीची छायाचित्रे काढताना दिसत होते.
लोकमान्य नगर ते सुभाष नगर या साडेपाच किलोमीटर अंतरादरम्यान मेट्रो ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना रहिवासी वस्त्या आहेत. अचानक मेट्रोगाडी घराबाहेरून जाताना बघून अनेक रहिवासी घराबाहेर आले. आपल्या डोळ्या समोरून जाणार्‍या मेट्रोचे छायाचित्र कॅमेर्‍यात कैद करीत होते.