नीरव मोदीचा कारागृहातील मुक्काम वाढला

    दिनांक :30-May-2019
- कोठडीत 27 जूनपर्यंत वाढ
लंडन,
पंजाब नॅशनल बँकेचे सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला आणि लंडनमध्ये अटक करण्यात आलेला हिर्‍यांचा व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत स्थानिक न्यायालयाने 27 जून पर्यंत वाढ केली आहे. यामुळे त्याला तूर्तास कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे.
 
 
 
वायव्य लंडनमधील वॉण्ड्‌सवर्थ कारागृहात त्याला डांबण्यात आले आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नीरव मोदीचे तीन जामीन अर्ज आतापर्यंत फेटाळले आहेत. न्यायालयाने यावेळी भारत सरकारला, नीरव मोदीविरोधात 14 दिवसांच्या आत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करण्यात आल्यास, त्याला कोणत्या कारागृहात ठेवण्यात येणार आहे, अशी विचारणा करताना, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आमच्या मते 14 दिवसांचा अवधी पुरेसा असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. दरम्यान, आतापर्यंतच्या सर्वच सुनावणीत, भारत सरकारच्या वतीने युक्तिवाद करणार्‍या सरकारी वकिलांनी, नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची 14 हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्यासाठी बोगस ‘लेटर्स ऑफ अंडरस्टॅण्डिंग’ अर्थात्‌ शपथपत्रे जारी केली आहेत, हे सिद्ध केले आहेत.