राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

    दिनांक :30-May-2019
-कॉंगे्रस-राकॉंच्या विलीनीकरणाची शक्यता
नवी दिल्ली,
लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रसचा देशात आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचा महाराष्ट्रात दारूण पराभव झाल्यानंतर, दोन्ही कॉंगे्रसच्या विलीनीकरणाची शक्यता पडताळून पाहण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून, याच अनुषंगाने कॉंगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची, त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
 
 
 
सुमारे एक तास चाललेल्या या भेटीत देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी सूत्रांच्या मते, दोन्ही कॉंगे्रस एकमेकांमध्ये विलिन झाल्यास ताकद वाढेल आणि महाराष्ट्रात होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा सामना करणे सोपे जाईल, हे या भेटीमागील मुख्य कारण आहे.
 
शरद पवारांनी यापूर्वी 1986 मध्ये त्यांचा समाजवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये हे विलीनीकरण पार पडले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा पवारांनी हा प्रस्ताव मान्य केल्यास इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल, असेही सूत्रांचे मत आहे.
राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाल्यास, लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसच्या वाट्याला येऊ शकते. कॉंग्रेसकडे सध्या केवळ 51 खासदार आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी किमान 55 खासदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे 5 खासदार आहेत. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेमध्ये विलीन झाल्यानंतर कॉंग्रेसचे संख्याबळ 56 होईल आणि कॉंगे्रसला अधिकृत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा मिळेल.
 
2014 मधील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ 44 जागा िंजकता आल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेसला लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाला मुकावे लागले होते. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते म्हणून समाधान मानावे लागले होते.