राजीव कुमारांना कोलकाता उच्च न्यायालयाचा दिलासा

    दिनांक :30-May-2019
अटकेपासून दिले एक महिन्याचे कवच
कोलकाता,
शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून अटक टाळत असलेले कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना, कोलकाता उच्च न्यायालयाने आज गुरुवारी मोठा दिलासा दिला आहे. 10 जुलैपर्यंत कुमार यांना अटक केली जाऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 
 
 
सीबीआयने बजावलेली नोटिस रद्द करण्यासाठी राजीव कुमार यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. प्रकाश बॅनर्जी यांच्या अंशकालीन पीठाने असे स्पष्ट केले की, सध्या न्यायालयाला उन्हाळी सुट्या लागलेल्या आहेत. 10 जूनपासून न्यायालयाचे कामकाज सुरू होईल. यामुळे आम्ही कुमार यांना 10 जूनपर्यंत आणि तिथून पुन्हा एक महिना म्हणजे 10 जुलैपर्यंत अटक न करण्याचे आदेश देत आहोत. यावेळी न्यायालयाने कुमार यांना आपले पासपोर्ट 24 तासांच्या आत जमा करण्याचे आदेशही दिले.
 
आम्ही अटकेपासून दिलासा दिला असला, तरी कुमार यांनी या काळात सीबीआयच्या तपासात सहकार्य करावे, तसेच दररोज सायंकाळी चार वाजता त्यांनी सीबीआयकडे आपली उपस्थिती नमूद करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. चिटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा आणि सत्य दडपल्याचा आरोप सीबीआयने राजीव कुमार यांच्यावर ठेवला असून, तपासात सहकार्य करण्यासाठी चौकशीकरिता उपस्थित राहा, असे निर्देश देणारी नोटीस बजावल्यानंतर, कुमार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.