मराठीतील पहिला वेब सिनेमा 'संतुर्की'चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :30-May-2019
मुंबई,
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली सुप्रसिद्ध मराठी वेबसीरिज 'गावाकडच्या गोष्टी'ने एक नवं वळण घेतलं आहे. वेबसीरिजचे दोन पर्व जरी संपले असले तरी हा पूर्णविराम नाही. कोरी पाटी प्रोडक्शनच्या गावाकडच्या गोष्टीमधील लोकप्रिय जोडी "संत्या-सुरकी" यांची प्रेमकथा आपल्याला नितीन पवार दिग्दर्शित "संतुर्की" या वेब सिनेमाद्वारे पाहता येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे.
 
मराठी मनोरंजन जगातील हा पहिला प्रयोग असून व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून दर्शकांसाठी आपला पहिला टीजर प्रदर्शित केला होता. टीजरला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्वत्र 'संतुर्की'ची चर्चा रंगली होती. संतुर्की या वेब सिनेमाचा ट्रेलर कोरी पाटी प्रोडक्शन्स या यूट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
साधी आणि सर्वांना आपलीशी वाटावी अशी कहाणी असलेली 'गावाकडच्या गोष्टी' या वेबसीरिजचे दोन यशस्वी पर्व झाले. गावा-शहरांपासून अगदी सातासमुद्रापार या वेबसिरीजची हवा झाली. सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेब सीरिजला जगभरातून प्रेम मिळालं. यामधील "संत्या आणि सुरकी" हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय झालं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्तव त्याचं लग्न होऊ शकल नाही.
लग्न झालेली सुरकी पुन्हा संतोष समोर येते तेव्हा त्याची होणारी तगमग किंवा तिच्या मुलाने मामा म्हटल्यावर होणारी गंमत सगळ्यांना भावली. पण यासोबत सगळ्यांना वेध लागले की इतकं जीवापाड प्रेम करणारी ही दोघं एकमेकांपासून वेगळे का झाले? याचं उत्तर या कोरी पाटी प्रोडक्शनच्या 'संतुर्की' सिनेमात आहे.
'संतुर्की' वेब सिनेमामध्ये संतोष राजे महाडिक, रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर के.टी.पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलीकर, समाधान पिंपळें हे कलाकार देखील सिनेमात असणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केलं आहे.