दुष्काळावर मात करून फुलविली केशर आंब्याची बाग

    दिनांक :30-May-2019
सावरगाव (कान्होबा) येथील शेतकऱ्याची यशोगाथा
सावरगाव : पंचवीस ते तीस वर्षांआधी प्रत्येक गावात अमराया दिसायच्या परंतु आज बदलत्या परिस्थितीनुसार अमराया नामशेष झाल्या असताना अतिशय मेहनत व प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सावरगाव (कान्होबा) येथील प्रयोगशील शेतकरी शेषराव गोबरा राठोड यांनी वास्तवात आणून शक्य करून दाखविली आहे.राठोड यांच्या प्रयोगशीलतेमुळे विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर नवीन उमेद आणि आशेचा किरण निर्माण झाला आहे.सावरगाव (कान्होबा) येथील राठोड हे पूर्वीपासूनच आपल्या शेत शिवारात विविध प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पारंपरिक पिकांसोबतच नगदी उत्पन्न घेणाऱ्या फळाचे पिके सुद्धा अतिशय नियोजनबद्ध रीतीने मागील अनेक वर्षापासून घेऊन बळीराजा समोर नवा आदर्श ठेवला आहे. आपल्या शेतात पिके घेत असताना शेत जमिनीचा पोत टिकून राहावा व शिवार प्रदूषित होऊ नये यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कटाक्षाने ते टाळतात आणि सेंद्रिय खताचा वापर पीके बहरण्यासाठी करतात इतकेच नव्हे तर आपल्या शेतात शेषराव राठोड यांनी गांडूळ खतासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून गांडूळ खत निर्मिती ते स्वतः करतात.
 

 
 
 
वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातूनच नव्हेतर अख्या महाराष्ट्रामधून दर दिवशी शेतकरी आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रात येत असताना शेषराव राठोड त्यांच्या या वयातील कर्तृत्वामुळे आजही जगाचा पोशिंदा आपल्या जीवनामधील निराशेच्या गर्तेते मधून बाहेर पडून नवचैतन्य निर्माण करू शकतो व काळ्या आईच्या कुशीमधून मोती पिकवू शकतो ही आशा राठोड यांच्यामुळे निर्माण झाली आहे. शेषराव राठोड यांनी सावरगाव (कान्होबा) येथील दोन एकर क्षेत्रफळात सात वर्षांपूर्वी केशर आंब्याची लागवड केली होती यावर्षी राठोड यांची झाडे आंब्यांनी बहरली आहेत पहिल्या वर्षी दोन लक्ष रुपयांचे वर उत्पन्न आंब्यापासून राठोड यांना मिळाले. शेषराव राठोड यांनी आपली आंब्याची बाग ठिबक सिंचन पद्धतीने वाढविली असून त्यांच्या दोन एकरात साडेतीनशे आंब्याची झाडे उभी आहेत यांच्या शेतात केवळ आंब्याची बाग नाही तर तब्बल पंधरा एकर क्षेत्रात दोन हजार आठशे संत्र्याची झाडेही एका वर्षाच्या आधी ठिबक सिंचन पद्धतीने लावली असून संत्र्याची बागही कमी पाण्यावर फुलविणार असल्याचे ते सांगतात शेषराव राठोड व त्यांची पत्नी सुलोचना राठोड या शेतकरी दंपतीला दोन मुले असून दोन्ही मुले नोकरी व व्यवसायानिमित्त कायम बाहेरगावी असल्यामुळे राठोड यांनी झाडांनाच आपली संतती मानून मुलाप्रमाणे त्यांचे संगोपन स्वतः आणि मजुराच्या सहकार्याने आजपर्यंत ते करत आले आहेत. शेती पिकवितांना पाणी कमी आणि घामाच्या धारा अधिक वाहाव्या लागतात परंतु उपलब्ध पाण्याचे नियोजन बद्ध उपयोग केल्यास राठोड दाम्पत्या सारखे लाखो रुपये आपणही आपल्या शेत शिवारात कमवू शकतो याची चर्चा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये होतांना दिसते शासना द्वारा तथा कृषि विद्यापीठे आणि कृषी विभागामार्फत आयोजित कृषी प्रदर्शनीला शेषराव राठोड आणि त्यांच्या अर्धांगिनी आवर्जून भेटी देतात आधुनिक शेती, पशुविज्ञान,फळझाड निर्मिती सेंद्रिय खते,अद्यावत कृषी अवजारे यांचे माहिती वेळोवेळी घेऊन आपल्या शेत शिवारात शक्य तेवढे प्रयोग ते दांपत्य करून वाशिम जिल्ह्यातील आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यासमोर नवा आदर्श निर्माण करीत आहेत. वाशिम जिल्हा व राज्याचा बराच भाग दुष्काळाच्या झळा सोशीत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या फळबागा डोळ्यासमोर नष्ट होताना पहाव्या लागत लागल्या असतांना योग्य नियोजनाच्या बळावर आपण प्रतिकूल परिस्थिती वर नक्कीच मात करू शकतो असा आशावाद आपल्या जिद्दीच्या बळावर राठोड दाम्पत्यांनी तरुण भारत जवळ व्यक्त केला.