विश्वचषक २०१९; यजमान इंग्लंडपुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

    दिनांक :30-May-2019
लंडन ,
 
क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम गुरुवारपासून सुरू होणार आहे. धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असलेल्या यजमान इंग्लंडपुढे विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रतिभावान गोलंदाजांचा भरणा असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.
 
 
 

 
मायदेशातील खेळपट्टय़ा, चाहत्यांचा पाठिंबा आणि गेल्या वर्षभरातील दिमाखदार कामगिरीमुळे साहजिकच इंग्लंडला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०१५च्या विश्वचषकात इंग्लंडला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र २०१७च्या चॅम्पियन्स करंडकानंतर यंदा नव्या दमाच्या खेळाडूंसह इंग्लंडने कर्णधार ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी केली. विशेषत: फलंदाजीत इंग्लंडने जवळपास अनेक विक्रम मोडीत काढून भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजले आहे. जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जो रूट, जेसन रॉय व स्वत: मॉर्गन कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येऊन सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता बाळगून आहेत.
दुसरीकडे २०१५च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या आफ्रिकेपुढे सर्वात मोठे आव्हान असेल ते डेल स्टेनच्या धक्क्यातून सावरण्याचे. खांद्याच्या दुखापतीमुळे स्टेनने पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. त्याशिवाय लुंगी एन्गिडी व कॅगिसो रबाडासुद्धा नुकतेच दुखापतीतून सावरले असल्यामुळे आफ्रिकेच्या खेळाडूंना तंदुरुस्तीवर विशेष लक्ष पुरवावे लागणार आहे.
सामना क्र. १
इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका
स्थळ : द ओव्हल, लंडन
सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार प्रवाह मराठी.
संघ
इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जोस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल रशीद, मार्क वूड, लिआम प्लंकेट, जोफ्रा आर्चर, जेम्स विन्स, लिआम डॉवसन, ख्रिस वोक्स, टॉम करन.
दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेपी डय़ुमिनी, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, डेल स्टेन, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ताबारेझ शम्सी, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, व्हॅन डर डुसेन.