वर्ल्डकपच्या इतिहासातील रोमांचक सामने

    दिनांक :30-May-2019
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 स्पर्धेला सुरुवात झाली असून यावेळीही अनेक रोमांचक सामने पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक विश्वचषकात आपल्याला रोमांचक सामने पाहायला मिळाले. मात्र, विश्‍वचषक स्पर्धेच्या ४४ वर्षांच्या इतिहासात अनेक रोमांचक सामने झाले, त्यापैकी काही सामने :

वर्ल्डकप 1983 : प्रक्षेपित न झालेले कपिलचे शतक
या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आणखी एका मोठ्या उलटफेरकडे वाटचाल सुरू केली होती. भारताचे आघाडीचे पाच फलंदाज अवघ्या 17 धावांत पॅव्हेलियनकडे परतले होते. मात्र, त्यानंतर कर्णधार कपिलदेवने 138 चेंडूत 175 धावांची स्फोटक व नाबाद खेळी साकारल्याने भारताला 266 धावांपर्यंत मजल मारता आली. या शानदार खेळीचा आनंद केवळ टनब्रिज वेल्सच्या नेविल मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीच लुटला. कारण, त्यावेळी बीबीसीचे टेक्निशियन संपावर होते. यामुळे या सामन्याचे प्रक्षेपण होऊ शकले नाही. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला पराभूत तर केलेच; याशिवाय बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारून स्पर्धेचे जेतेपदही पटकावले.
 

 
वर्ल्डकप 1999 : सामना टाय; मात्र ऑस्ट्रेलिया विजयी
वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामना म्हणून याकडे बघितले जाते. एजबस्टन येथे झालेल्या या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा काढल्या होत्या. द. आफ्रिकेच्या शॉन पोलॉकने 36 धावा देऊन पाच विकेट घेतल्या. विजय मिळविण्यासाठी शेवटच्या षटकात द. आफ्रिकेला 9 धावांची गरज होती. लान्स क्लूजनरने या षटकात दोन चौकार ठोकून ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येशी बरोबरी साधली. यामुळे विजयासाठी अवघी एक धाव हवी असताना क्लूजनरने चेंडू मिडऑफवर फटकावला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला; पण नॉन स्ट्राईकवरील अ‍ॅलन डोनाल्डने चांगला प्रतिसाद दिला नाही व त्याची बॅट निसटली आणि गिलख्रिस्टने क्षणाचाही विलंब न लावता त्याला धावबाद केले. हा सामना टाय झाला; पण चांगल्या रनरेटमुळे ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला.
 

 
वर्ल्डकप 2011 : ओब्रायनमुळे इंग्लंड पराभूत
या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने आयर्लंडविरुद्ध चांगली फलंदाजी करत 327 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यापूर्वी वर्ल्डकपमध्ये इतक्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग कोणत्याच संघाने केला नव्हता. मात्र, केविन ओब्रायनने वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाची नोंद करत आयर्लंडला रोमांचक विजय मिळवून दिला. आयर्लंडची एकवेळ पाच बाद 111 अशी अवस्था असताना ओब्रायनने 50 चेंडूत 13 चौकार व 6 षटकारांसह शतकी खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडला मात्र नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला.
 
 

 
वर्ल्डकप 2015 : एलियॉटमुळेे द. आफ्रिका पराभूत
फाफ डू प्लेसिस आणि ए. बी. डिव्हिलियर्स यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनल लढतील 43 षटकांत 5 बाद 282 धावा काढल्या असताना जोरदार पावसाने मैदानावर हजेरी लावली. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडला 198 धावांचे टार्गेट मिळाले. अष्टपैलू ग्रँड इलियॉटने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी केली. विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूत पाच धावांची गरज असताना इलियॉटने डेल स्टेनच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. इलियॉटने केलेल्या नाबाद 84 धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या स्पर्धेत न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, या संघाला 6 सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.